

पुढारी ऑनलाईन : सरकारचे शिष्टमंडळ येण्याआधी सरकार प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी आंदोलनस्थळी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जालन्यातील मराठा आरक्षणप्रश्नाचा चेहरा बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी खोतकर यांनी चर्चा केली. आरोग्याची चौकशी केली. दरम्यान, शासनाची भूमिका समजून सांगत मनोज जरांगे पाटीलांची खोतकरांकडून पुन्हा मनधरणी करण्यात आली. पण मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम असून, ते उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Jalna Maratha Andolan)
काल सरकारने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आज पुन्हा सरकारच्यावतीने अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटीलांची भेट घेतली. १५ मिनिटे चर्चा करून ते परत गेले. इतर तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. तसेच आज पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ दुपारी १२.३० वाजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Jalna Maratha Andolan)
अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी अर्जुन खोतकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतली आहे. काल देखील ते उपोषणकर्त्यांच्या भेटीला गेले होते. दरम्यान मुख्यमंत्री खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट फोनवर संवाद साधून दिला होता. त्यानंतर ते आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान 'सरकारने जीआर, काढावा एवढीच आमची मागणी असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हणत 'सरकारने जीआर काढावा' अशी पुन्हा एकदा मागणी केली आहे. (Jalna Maratha Andolan)
जालन्यातील पोलिसांच्या लाटीचार्जनंतर मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी अनेक ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी आंदोलन, मोर्चे आणि निदर्शने केली जात आहेत.