

प्राचीन इस्रायली साम्राज्याचे उल्लेख हिब्रू बायबलमध्ये आहेत. अर्थात, ऐतिहासिक पुरावे मात्र नाहीत. कालांतराने हा भाग बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक (अलेक्झांडर), रोमन, बायझेंटाईन आणि नंतर मुस्लिम शासकांच्या आधिपत्त्याखाली आला. इथे राज्य करणारे अखेरचे मुस्लिम शासक होते उस्मानी (ऑटोमन).
इसवी सन पूर्व 1700 शतकात इथे कॅननाईट लोकांनी राज्य केले. मग इजिप्तच्या फेरोनने, नंतर आले इस्रायली म्हणजे आजच्या ज्यूंचे (यहुदी) पूर्वज.
इसवी सन पूर्व 1000 च्या पूर्वार्धात जेरुसलेम, आताचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबेनॉन आणि सीरिया या देशांचा प्रत्येकी काही भाग मिळून इस्रायली लोकांची 2 साम्राज्ये होती. प्राचीन इस्रायल आणि जुदाहचे राज्य. जेरुसलेम हे जुदाहच्या राज्याची राजधानी होते.
इस्रायलची कथा गुंतागुंतीची यासाठीही आहे की, हा भाग ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तिन्ही समुदायांसाठी धार्मिकद़ृष्ट्या महत्त्वाचा आहे. प्रेषित इब्राहिम यांना याहोवाने (ज्यूंचा ईश्वर) इस्रायल ही भूमी ज्यूंसाठी प्रदान केली, अशी ज्यूंची श्रद्धा आहे. जेरुसलेममधील किंग सॉलोमन यांनी बांधलेले मंदिर ज्यूंसाठी पवित्र आहे. या मंदिराची एक भिंतच आता शिल्लक आहे. या भिंतीलगत मुस्लिमांचे खलिफा हजरत उमर यांनी बांधलेली अल-अक्सा मशीद आहे. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याशीही हे ठिकाण संबंधित आहे. दुसरीकडे, येथेच क्रुसावर खिळविल्यानंतर प्रभू येशूचे पुन:अवतरण झाले होते, अशी ख्रिश्चनांची श्रद्धा आहे. या भागात व या भागावरून यहुदी-ख्रिश्चन, ख्रिश्चन-मुस्लिम असे संघर्ष यापूर्वी झालेले आहेत. सध्या या संघर्षाचे स्वरूप यहुदी-मुस्लिम असे आहे.
सन 1095 मध्ये पोप अर्बन द्वितीय यांनी मुस्लिमांच्या जिहादला प्रत्युत्तर म्हणून ख्रिश्चनांनी क्रूसेड सुरू करावे, असे आवाहन केले. पुढे ख्रिश्चन-मुस्लिम युद्ध 200 वर्षे चालले.
लॅटिन चर्चने मुस्लिम आधिपत्त्याखालील पवित्र शहर जेरुसलेमसह पवित्र भूमीवरील ताब्यासाठी युद्धे केली. आजचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, सीरिया आणि लेबेनॉनचा काही भाग म्हणजे पवित्र भूमी होय. पोप अर्बन द्वितीय यांच्या आवाहनानंतर एक लाखांवर ख्रिश्चन त्यासाठी युरोपातून बाहेर पडले. युरोप पार करताना त्यांनी ज्यूंवरही हल्ले केले.
तेव्हा 400 वर्षांपासून जेरुसलेम मुस्लिम शासकांच्याच ताब्यात होते. ज्यूंचे प्रमाण नगण्य झालेले होते. चार वर्षांच्या चढाईनंतर जेरुसलेम ख्रिश्चनांच्या ताब्यात आले. त्यानंतर जवळपास 100 वर्षे (1099 ते 1187) जेरुसलेम आणि आसपासच्या भागात त्यांचे राज्य होते. सलाऊद्दीन अय्युबीच्या नेतृत्वाखाली मुस्लिम योद्ध्यांनी पुन्हा एकदा हा भाग जिंकला. पुढेही अनेक वर्षे इस्रायल हा मुस्लिम उस्मानी साम्राज्याचा (ऑटोमन) एक भाग होता. पहिल्या महायुद्धात (1918) ब्रिटिशांनी उस्मानी साम्राज्याचा संपूर्ण पाडाव केला आणि इस्रायलवर ब्रिटनचे राज्य आले. दुसर्या महायुद्धामध्ये ब्रिटन आणि मित्र राष्ट्रांचा विजय झालेला असला तरी या युद्धात ब्रिटनची हानी मात्र प्रचंड झाली होती. वसाहतींचा कारभार चालविणेही ब्रिटनला अवघड बनलेले होते. मे 1948 मध्ये मग ब्रिटनने इस्रायलला वार्यावर सोडून दिले.
ब्रिटनने येथून काढता पाय घतला आणि स्थानिक अरब आणि ज्यू लोकांमध्ये संघर्ष पेटला. अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या फारच कमी होती; पण ज्यूंची जिद्द आणि तयारी अरबांच्या तुलनेत उजवी ठरली. 14 मे 1948 रोजी इस्रायलने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. तब्बल 2 हजार वर्षांनी पहिल्यांदा संपूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. मुस्लिमबहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश जन्माला आला. सर्वच शेजारी शत्रू होते. इजिप्त, सीरिया, जॉर्डन, लॅबेनॉन आणि इराकचे सैन्य एक दिवस वयाच्या या देशावर चालून आले. मुस्लिमांना इस्रायलचे अस्तित्वच मिटवून टाकायचे होते, तर इस्रायलला देशातील मुस्लिमांना हाकलून साम्राज्यविस्तार करायचा होता.
बाल्फोर जाहीरनामा
सातत्याने विस्थापित होणे वाट्याला येणे, युरोप तसेच अरब देशांतून मिळालेली अन्याय्य वागणूक यामुळे ज्यूंमध्ये ऐक्यभावना टोकाची विकसित झालेली होती. यातून ज्यूंची झायनेस्ट चळवळ जगभरात मजबूत झालेली होती. आपली मूळ भूमी स्वत:चा हक्काचा देश म्हणून मिळविणे, हे या चळवळीचे ध्येय बनले. मुस्लिम ऑटोमन साम्राज्याच्या पराभवानंतर ब्रिटनने बाल्फोर जाहीरनामा आणला. हे ज्यूंच्या झायनेस्ट चळवळीचेच फळ होते. ज्यू राष्ट्राच्या मागणीला बाल्फोर जाहीरनामा ही पहिली अधिकृत मान्यता होती. इंग्लंडच्या राजसत्तेचा पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांच्या देशाला पाठिंबा आहे आणि ज्यू लोकांना एक राष्ट्र मिळावे यासाठी मदत करण्याचा ब्रिटनकडून पुरेपूर प्रयत्न केला जाईल, असे या जाहीरनाम्यात नमूद होते. इतर लोकांच्या (मुस्लिम) नागरी आणि धार्मिक हक्कांवर मात्र गदा येता कामा नये, असेही या जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद होते.
जाहीरनाम्यानंतर या प्रदेशात ज्यूंसाठी देश निर्माण करण्याची जबाबदारी राष्ट्र संघानेही (लीग ऑफ नेशन्स) ब्रिटनवर टाकली. नंतर इस्रायलमध्ये जगभरातून ज्यूंचे येणे सुरू झाले. 1920 ते 1940 या दशकांत मोठ्या संख्येने ज्यू दाखल झाले. दुसर्या महायुद्धात हिटलरने ज्यूंच्या नरसंहाराला सुरुवात केल्यानंतर युरोपातील हजारो ज्यू या भागात आले. अर्थात, ऐनवेळी ब्रिटनने इस्रायलमधून काढता पाय घेतला होता; पण म्हणून ज्यूंचे मनोधैर्य काही कमी झाले नाही. त्यांनी स्वत: आपल्यासाठीचे राष्ट्र जाहीर केलेच! इस्रायलला देश म्हणून अमेरिका आणि रशियाने तत्काळ मान्यताही दिली. अर्थात, 1947 मध्ये ब्रिटनने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर मांडला होता.
झायनिस्ट चळवळीचा उदय
झायनिस्ट चळवळीचा उदय 1890 च्या काळात ब्रिटनमध्ये झाला. ज्यू सावकारांनी ती सुरू केली. चळवळीचे नेते रॉथ्सचाईल्ड हे ब्रिटनचे फायनान्सर होते. त्यांना नाराज करणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते. ब्रिटिशांना प्रत्यक्षात ज्यूंना काही द्यायचेही नव्हते.
ब्रिटिश राजवटीत ज्यू-मुस्लिम दंगली
दुसर्या महायुद्धाच्या काळातच ज्यूंनी इस्रायलमध्ये आपले सैन्यही उभे केले होते. ब्रिटिश राजवटीतच येथे अरब-ज्यू दंगली कायमच्या झालेल्या होत्या. अरबांनी नंतर ब्रिटिशांविरोधात उठाव केला. अशाच एका प्रसंगात ब्रिटिशांनी 5 हजारांवर अरबांना ठार केले होते. जेरुसलेमचे मुफ्ती अल-हुसैनी यांनी तेव्हा सीरियाला आश्रय घेतला होता. ब्रिटिशांनी काढता पाय घेताच, ज्यू आणि अरबांचे देशांतर्गत सैन्य एकमेकांना भिडले. पॅलेस्टिनी अरबांच्या मदतीला जॉर्डन, सीरिया, इराक, लेबेनॉन, इजिप्तचेही सैन्य आले. पाच देशांनी मिळून इस्रायलवर आक्रमण केले.