

पुढारी ऑनलाईन : Israel Attack on Syria : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel-Hamas War) दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. दरम्यान, इस्रायलने एकाच वेळी सीरियातील दमास्कस आणि अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणमधून येणाऱ्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर या दोन्ही विमानतळांवरील सर्व सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्रायली सैन्याने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवर हल्ल्याची पुष्टी केली आहे. स्थानिक मीडिया चॅनल शाम एफएमचे म्हणणे आहे की सीरियन लष्कराने या दोन्ही हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. अलेप्पो विमानतळावर इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Israel-Hamas War)
सीरियाच्या सरकारी टीव्ही वाहिनीने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने इस्रायलवर गंभार आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास इस्रायली लष्कराने अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट डागले. त्यामुळे विमानतळांच्या धावपट्टीची दुरवस्था झाली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या रक्तपातावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी इस्रायलने सीरियाला निशाणा बनवल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Israel-Hamas War)
दरम्यान, गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी युद्धाचा सहावा दिवस होता. आकाशातून रॉकेटचा वर्षाव सुरूच आहे. दोन्ही बाजूंच्या नागरिकांना याच्या झळा बसत असून अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. गाझामध्ये 1300 हून अधिक आणि इस्रायलमध्ये 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान, गुरुवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 150 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. गाझामधील अधिका-यांनी याबाबत सांगितले की, 'इस्रायलकडून जोरदार बॉम्बिंग सुरूच असून येथे लागू केलेल्या संपूर्ण नाकेबंदीमुळे आरोग्य यंत्रणा कोसळली आहे.'
इस्रायली सैन्य आणि हमास दहशतवादी यांच्यात सुरू असलेले युद्ध वाढतच आहे, दोन्ही बाजूंनी तीव्र हल्ले होत आहेत. गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याने बॉम्बफेक सुरू ठेवली आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांच्या सरकारने आपत्कालीन युद्ध मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे.