

खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावावर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर ही आदिवासी वाडी आहे. सध्या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. त्यांच्यासोबत मंत्री गिरीष महाजन, उदय सामंत, दादा भूसेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला.
सीएमओ महाराष्ट्राने ट्विट करत म्हंटल आहे की, "खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत. प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.
कोकणात पावसामुळे हाहाकार उडाल्याची परिस्थीती आहे. जोरदार पाऊस, अंधार आणि निसरडी वाटेमुळे बचाव पथकांना दुर्घटनास्थळी पोहचण्यात अडचणी निर्माण होत होत्या. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे रेस्कू ऑपरेशन केले जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.