

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर इराकी शहर एरबिलजवळ इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या गुप्त मुख्यालयावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने केला असल्याचे वृत्त 'अल जझीरा'ने दिले आहे . दरम्यान, या हल्ल्याला इस्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवाशांना अरिबल विमानतळावरच थांबवण्यात आले आहे. (Iran-Israel Conflict)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सने सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधातही हल्ले केले आहेत. अलीकडेच इराणमध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. हा हल्ला इस्त्रायलने घडवून आणल्याचा आरोप इराणने केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला.
इराणने म्हटलं आहे की, उत्तर इराकी शहर एरबिल जवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. एर्बिलच्या उत्तर-पूर्वेला सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन दूतावास तसेच नागरी वस्त्यांपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराकमधील एरबिल शहरातील अमेरिकेच्या दुतावासाजवळही अनेक स्फोट झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी अमेरिकन वाणिज्य दूतावास जवळील आठ ठिकाणांना लक्ष्य केले.
गेल्या आठवड्यात इराणमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोटामुळे इस्रायल-हमास युद्धाचा धोका वाढला आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन अरब देशांना भेट देऊ शकतात. इराण आणि हमासने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, दोन्ही देशांनी हे आरोप फेटाळले होते.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी इस्लामी गट हमास यांच्यात ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या युद्धानंतर मध्यपूर्वेमध्ये पसरलेल्या संघर्षाच्या वाढीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले आहेत. आता इराणचे मित्रदेश लेबनॉन, सीरिया, इराक आणि येमेनमधूनही मैदानात उतरले आहेत. इस्रायलसोबतच्या युद्धात हमासला पाठिंबा देणाऱ्या इराणने गाझामधील इस्रायली गुन्ह्यांना अमेरिकेने पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.