

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. या सामन्यात कोलकात्याच्या पॅट कमिन्सने डॅनियल सॅम्सच्या एका षटकात 35 धावांचा पाऊस पाडला होता. सॅम्सचे ते षटक आयपीएलच्या (IPL) सर्वात महागड्या षटकांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये याआधीही एका षटकात 30 पेक्षा जास्त धावा निघाल्या आहेत.
हर्षल पटेल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने एका षटकात तब्बल 37 धावा खर्च केल्या होत्या. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने 2021 मध्ये हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली होती. या षटकात तब्बल 37 धावा निघाल्या होत्या. आयपीएलमधील हे सर्वात महागडे षटक होय. विशेष म्हणजे त्या हंगामात हर्षल पटेलला 'पर्पल कॅप' मिळाली होती.
प्रशांत परमेश्वरन : 2011 मध्ये कोची टस्कर्सच्या प्रशांत परमेश्वरनच्या एका षटकात 37 धावा निघाल्या होत्या. बेंगलोरच्या फलंदाजांनी प्रशांतच्या एका षटकात 37 धावा वसूल केल्या होत्या. आयपीएलमधील सर्वात महागड्या षटकांपैकी हे एक होय.
परविंदर अवाना : एका षटकात सर्वाधिक धावा देणार्या गोलंदाजांमध्ये परविंदर अवाना याचाही समावेश आहे. 2014 मध्ये पंजाब किंग्जच्या परविंदरनेे एका षटकात 33 धावा मोजल्या होत्या. चेन्नई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात परविंदरच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पडला होता. (IPL)
रवी बोपारा : इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू रवी बोपाराचाही या नकोशा विक्रमांमध्ये समावेश आहे. रवी बोपाराने एका षटकात 33 धावा दिल्या होत्या. पंजाब आणि कोलकाता यांच्यात हा सामना रंगला होता.