Yashasvi Jaiswal : जैस्वालने मागितली बटलरची माफी! ‘ती’ चूक केली मान्य
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केकेआरचा सहज पराभव केला. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 208 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत केकेआरच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याने 13 चौकार आणि 5 षटकार ठोकून 98 धावा फटकावल्या. त्याचे शतक दोन धावांनी हुकले असले तरी नाबाद राहून त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण असे असूनही सामन्यानंतर जैस्वालने आपला सहकारी बटलरची माफी मागितल्याचे समोर आले आहे.
बटलर खाते न उघडता तंबूत परतला
या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal)पहिल्याच षटकात केकेआरचा कर्णधार नितीश राणाची गोलंदाजी फोडून काढली. त्याने या षटकात 26 धावा चोपल्या. मात्र, पुढचे षटक राजस्थानसाठी खराब ठरले. दुसऱ्या षटकात स्टार सलामीवीर जोस बटलर खाते न उघडता धावबाद झाला.
केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा हे षटक फेकत होता. पाचव्या चेंडू बटलरच्या पॅडवर आदळला. त्याच दरम्यान यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) एकेरी धाव घेण्यासाठी कॉल केला. मात्र, बटलर धाव घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पण, जैस्वालच्या हाकेवर तो धावला. यावेळी जवळच असलेल्या रसेलने चेंडू पकडला आणि वेळ दवडता तो विकेटच्या दिशेने फेकला. चेंडूने अचूक वेध घेतला तेव्हा बटलर क्रीजपासून खूप दूर होता. त्यामुळे त्याला एका चुकीमुळे बाद होऊन माघारी परतावे लागले.
जैस्वालने कबूल केली चूक (Yashasvi Jaiswal)
सामना संपल्यानंतर यशस्वी जैस्वालने बटलरच्या धावबाद वरून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'जॉस बटलरकडून मी खूप काही शिकलो आहे. माझ्या चुकीमुळे त्याने विकेट गमावली हे दुर्दैवी आहे. कोणीही जाणूनबुजून धावबाद होऊ इच्छित नाही. पण माझ्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. त्यासाठी मी त्याची माफी मागतो.'
केकेआरविरुद्ध जैस्वालने तुफानी खेळी केली. त्याने पहिल्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. तसेच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनसोबत 121 धावांची शानदार भागीदारी केली.

