

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट प्लेअर' हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार सामन्यादरम्यान दोन्ही संघाना एका खेळाडूला विश्रांती देऊन त्याच्या जागी पर्यायी खेळाडू मैदानात उतरवण्याची मुभा आहे.
टॉसनंतर दोन्ही कर्णधारांना 5-5 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या नियमानुसार आता सामन्यात 11 ऐवजी 12 खेळाडू खेळू शकतात. 12 व्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर असे म्हटले जाते.
यंदाच्या हंगामात सर्व संघ या नियमाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दिल्ली कॅपिटल्ससारख्या संघांना या नव्या नियमाचा फायदा घेता आला नाही. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर बेंगलोरने या नियमाच्या आधारे चांगली कामगिरी केली आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये दिल्लीने सलामीवीर पृथ्वी शॉचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला. म्हणजेच तो फक्त फलंदाजीला आला. पण इम्पॅक्ट खेळाडू म्हणून त्याची कामगिरी खूपच खराब झाली. दुसरीकडे, फाफ डुप्लेसीने आरसीबीसाठी या नियमाचा योग्यरीतीने फायदा घेतला आहे.
विशेष म्हणजे क्षेत्ररक्षण न करता फलंदाजीला येणारे बहुतांश फलंदाज जास्त धावा करू शकलेले नाहीत. वास्तविक, आयपीएलचा 37 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला, या सामन्यात चौथ्या क्रमांकाचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून युवा आकाश सिंगच्या जागी अंबाती रायुडूला मैदानात उतरवण्यात आले. परंतु तो खाते न उघडताच तंबूत परतला. रायुडू बाद झाल्यानंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या नव्या नियमाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
क्षेत्ररक्षण न करता थेट फलंदाजीला येण्याच्या निर्णयावर सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, 'तुम्ही क्षेत्ररक्षण न करता फलंदाजीला येता आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करता. एक फलंदाज म्हणून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही.' यासाठी त्यांनी पृथ्वी शॉचे आणि रायडूचे उदाहरण दिले.