पोर्ट लुईस; पुढारी वृत्तसेवा : मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू राहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन केले आहे. सावरकर जयंती दिनी आयोजित या संमेलनाचे औचित्य साधत महाराष्ट्राने भेट दिलेल्या सावरकरांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र आणि मॉरिशस यांचे व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठीच महाराष्ट्र शासनाने वीर सावरकरांचा हा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे भेट दिला आहे. वीर सावरकरांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसच्या समस्त हिंदू आणि मराठी बांधवांना मिळत राहील, असे उद्गार मंत्री चव्हाण यांनी यावेळी काढले.
या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सीएसके असंत गोविंद, खासदार अॅश्ले इट्टू, राष्ट्रीय वारसा निधी संचालक शिवाजी दौलतराव, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे सरचिटणीस बाबुराम देवरा, क्रॉसवेज इंटरनॅशनल, मॉरिशसचे व्यस्थापकीय संचालक दिलीप ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.