

सना; वृत्तसंस्था : येमेनने 2015 मध्ये एक दशलक्ष बॅरल तेलाने भरलेले 'साफेर' हे सुपर टँकर लाल समुद्रात सोडलेले होते. आता 8 वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रांनी हे जहाज समुद्रात फुटेल किंवा बुडेल, असा इशारा दिला आहे. तसे घडल्यास येमेनसह 4 देशांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
1976 मध्ये जपानच्या हिताची जेसोन कंपनीने या जहाजाची निर्मिती केली होती. ते 362 मीटर लांब असून, त्याचे वजन 4 लाख 6 हजार 640 टन आहे. 1988 मध्ये येमेनच्या एका कंपनीने या जहाजाचे सुपर टँकरमध्ये रूपांतर करून त्यात तेलाची साठवणूक व वाहतूक सुरू केली. 2015 मध्ये येमेन सरकार व हुती बंडखोर असे गृहयुद्ध सुरू झाले. येमेनचा समुद्रकिनार्याकडील भाग हुती बंडखोरांच्या ताब्यात गेला. समुद्रात उभ्या 'साफेर'ची दुरुस्ती येमेनमधील कंपनीला करायची होती; पण हुती बंडखोरांनी ती दिली नाही.
ऑक्टोबर 2019 मध्ये एका संस्थेने या जहाजातून इंधन गळती होऊन सागरी जीवांना धोका उद्भवेल, असा इशारा दिला होता. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी केली; पण उपयोग झाला नाही. जहाजाच्या इंजिन रूममध्ये समुद्राचे पाणी शिरत असल्याने जहाजाचा स्फोट होऊ शकतो, असे वृत्त 2020 मध्ये 'बीबीसी'ने दिले होते. आता संयुक्त राष्ट्रांनीच हे जहाज फुटण्याचा इशारा दिला आहे. लाल समुद्रातील टाईम बॉम्ब असा या जहाजाचा उल्लेख आता केला जात आहे.