अंकारा/दमिष्क; वृत्तसंस्था : तुर्कीतील कहरामनमारासमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.7 होती. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या 3 मोठ्या भूकंपांनंतर सातत्याने आफ्टरशॉक्स सुरूच आहेत. त्यामुळे बचावकार्यातही अडथळे येत आहेत तसेच भय इथले संपत नसल्याची स्थिती कायम आहे.
भरीस भर म्हणून तुर्की-सीरिया सीमेलगतच्या भागांत विविध गटांत चकमकी सुरू झाल्या आहेत. जर्मनीचे एक बचाव पथक या भागात मदत कार्यात गुंतलेले असतानाच एक चकमक घडली. जीवाला धोका असल्याने जर्मनीचे हे पथक बचाव कार्य सोडून निघून गेले. तळहातावर जीव घेऊन भारतीय बचाव पथकांचे मदतकार्य मात्र अविरत सुरूच आहे.
तुर्की-सीरियात मिळून मृतांची संख्या आता 34 हजारांवर गेली आहे. सीरिया सीमेवरील बचावकार्य सोडून अनेक देशांतील बचाव पथके माघारी फिरत आहेत. रविवारी इस्रायलने सुरक्षेचे कारण सांगून हत्झाला ग्रुप या बचाव पथकाला आपत्कालीन विमान पाठवून परत बोलावून घेतले. याआधी जर्मनी आणि ऑस्ट्रियाने तुर्कीतून आपापली बचावपथके माघारी बोलावली आहेत.
भूकंपादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्कीतील गाझियांटेप शहरातील एका रुग्णालयातील सीसीटीव्हीतून समोर आलेले हे फुटेज आहे. धक्क्याने रुग्णालयाची इमारत हादरत असताना तैनात परिचारिका पळून गेल्या नाहीत. त्याऐवजी अतिदक्षता विभागातील इनक्यूबेटर थरथरत असल्याचे पाहून त्यांचेे मातृहृदय जागे झाले आणि त्यांनी बाळ पडू नये म्हणून थरथरणारे इनक्यूबेटर आपल्या हातांनी घट्ट धरून ठेवले.