इस्लामाबाद : वृत्तसंस्था
शनिवार-रविवारच्या दरम्यान मध्यरात्री झालेल्या अविश्वास प्रस्तावावरील मतदानानंतर पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे इम्रान खान सरकार कोसळले. विरोधी पक्षांच्या आघाडीने पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड जाहीर केली अन् लगोलग शाहबाज यांनीही तेच रागरंग उधळले. काश्मीर प्रश्न सुटत नाही तोवर भारताशी संबंध सुधारणार कसे, असा इम्रान खान यांचाच राग शाहबाज यांनीही आळवला.
शाहबाज यांनी पंतप्रधानपदासाठी आपला उमेदवारी अर्ज रविवारी दाखल केला. यानंतर त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. लगेचच इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदान 11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता सुरू होईल. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते तसेच माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांची परराष्ट्र मंत्रिपदी निवड केली जाईल, असे संकेत आहेत. इकडे संसद सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार उपसभापती कासिम सुरी यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे सोमवारी होणार्या अधिवेशनादरम्यान तेच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील.