इस्लामाबाद; वृत्तसंस्था : जीवघेण्या महागाईचा मुकाबला करताना जनता त्राही त्राही झालेली असताना पाकिस्तान 160 अब्ज रुपये करवसुलीला तयार झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंजूर केलेल्या 7 अब्ज डॉलरपोटी पहिला हप्ता म्हणून 1.1 अब्ज डॉलर अदा करण्यापूर्वी तशी अटच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसमोर ठेवली होती. पाक शर्ती स्वीकारत नाही म्हटल्यावर 'आयएमएफ'चे अधिकारी बैठकीतून निघूनही गेले होते. 'मरता क्या न करता' या न्यायाने अखेर पाकला या अटी मान्य कराव्या लागल्या आणि तसे पाक अर्थमंत्री इसहाक डार यांनी शनिवारी जाहीरही केले.
नाणेनिधीचा चमू कर्जाबाबतच्या कुठल्याही अंतिम निर्णयाशिवाय गुरुवारी इस्लामाबादेतून निघून गेला होता. अटी-शर्तींमध्ये सर्व क्षेत्रांचे अनावश्यक अनुदान संपुष्टात आणण्याचेही एक कलम आहे. त्यावरही पाकिस्तान तयार झाला आहे. आता नवे निर्णय लागू करण्याच्या तर्हा कशा असतील, त्यावर निर्णय तेवढा व्हायचा आहे. पाकमध्ये आता गॅस, ऊर्जा क्षेत्रातील अनुदान रद्द होईल. डिझेलवर 50 रुपये करवाढ केली जाईल.
महसूल संकलनाचे कायमस्वरूपी उपाय नसतील, अनुदानांची उधळण असेल तर कर्ज द्यावे कसे?
– नॅथन पोर्टर, आयएमएफ चमू प्रमुखआयएमएफ सांगते तशा आर्थिक सुधारणा कराव्याच लागतील. दुसरा पर्याय नाही. जनतेने तयार राहावे.
– इसहाक डार, अर्थमंत्री, पाकिस्तान