Xi Jinping Welcomes Trump | ट्रम्प यांना जिनपिंग यांनी आलिंगन देत मोडला सात दशकांचा प्रोटोकॉल

पुतीन यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन; आजच्या बैठकीकडे लक्ष
Xi Jinping Welcomes Trump |
Xi Jinping Welcomes Trump | ट्रम्प यांना जिनपिंग यांनी आलिंगन देत मोडला सात दशकांचा प्रोटोकॉल
Published on: 
Updated on: 

शेन्‍झेन (चीन); वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बुधवारी चीनच्या शेन्‍झेन या हाय-टेक शहरात आगमन होताच त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून ट्रम्प यांना आलिंगन दिले. चिनी सर्वोच्च नेत्याकडून अशा प्रकारे जाहीर स्नेह व्यक्त होण्याची ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जात आहे.

सप्टेंबर महिन्यात जिनपिंग यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यात ट्रम्प यांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून जिनपिंग यांनी हा प्रोटोकॉल मोडला. चीनचे संस्थापक माओ त्से तुंग यांनी सुमारे सात दशकांपूर्वी सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांचे विमानतळावर स्वागत केले होते; त्यानंतर प्रथमच चिनी राष्ट्राध्यक्षांनी परदेशी नेत्याचे असे स्वागत केले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी सुमारे २० मिनिटे संवाद साधत चिनी 'जे-१० सी' लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहिली.

पुतीन यांच्या स्वागतात वेगळेपण

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे स्वागत जिनपिंग यांचे निकटवर्तीय आणि कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते काई ची यांनी केले. साधारणपणे पक्षाचे वरिष्ठ नेते विमानतळावर जात नसल्याने पुतीन यांच्यासाठीही हा विशेष सन्मान मानला जात आहे. बुधवारी रात्री २१ देशांच्या 'एपेक' शिखर परिषदेच्या स्नेहभोजनावेळी ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन यांच्यात हलक्याफुलक्या गप्पा रंगल्याचे पाहायला मिळाले.

ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठकीकडे जगाचे लक्ष

मनिला येथून शेंझेनमध्ये दाखल झालेले ट्रम्प गुरुवारी जिनपिंग आणि पुतिन यांच्यासोबत ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक घेणार आहेत. जगातील तीन बलाढ्य देशांचे प्रमुख प्रथमच एकत्र येत असून यामध्ये युक्रेन संघर्ष, इराण युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अण्वस्त्र कपात यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी या परिषदेला "क्रांतिकारी" म्हटले असले, तरी या पहिल्याच बैठकीतून ठोस निष्कर्षापेक्षा प्रतीकात्मक संदेशच अधिक जाईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.