

UK woman dies
ब्रिटनमधून एका घटना समोर आली आहे. येथील एका ३२ वर्षीय महिलेचा स्कायडायव्हिंग करताना १० हजार फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला. सदर महिलेचा ब्रेकअप झाला होता. यामुळे ती अस्वस्थ होती. यामुळे तिने जाणूनबुजून पॅराशूट उघडले नाही, असे पोलिस आणि तिच्या मित्रांचे म्हणणे असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.
जेड डॅमारेल (Jade Damarell) असे त्या महिलेचे नाव आहे. साउथ वेल्समधील जेड हिची एक अनुभवी स्कायडायव्हर म्हणून ओळख होती. तिने यापूर्वी सुमारे ४०० वेळा स्कायडायव्हिंग केले होते. शॉटन कोलियरी येथील रेफोर्ड फार्म येथे स्कायडायव्हिंगदरम्यान तिचा मृत्यू झाला. येथे ती पॅराशूटमधून उतरणार होती. तिला वाचवण्यासाठी आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
डेली मेलच्या वृत्तानुसार, डॅमारेलचा तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिचा बॉयफ्रेंड बेन गुडफेलो सोबत ब्रेकअप झाला होता. २६ वर्षीय गुडफेलो देखील एक स्कायडायव्हर आहे. हे दोघेही सहा महिन्यांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिले. ते पॅराशूटिस्टकडून वापर होत असलेल्या एअरफील्डजवळ एका भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. पण दोघांचा नुकताच ब्रेकअप झाला होता. यामुळे जेड खूप अस्वस्थ होती.
त्यांच्या एका मैत्रिणीने म्हटले आहे की, ते दोघे कधीही वेगळे होणार नव्हते. एवढे त्यांच्यात प्रेम होते. त्यांनी त्यांचा सर्व वेळ एकत्र घालवला. ते त्यांचा सर्व वेळ एकत्र स्कायडायव्हिंग करण्यात घालवायचे. जेडच्या मृत्यूच्या घटनेच्या आदल्या रात्री, बेन याने तिच्यासोबतचे नाते तोडले होते. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी कामावर निघून गेला. यादरम्यान जेडच्या मृत्यूची घटना घडली."
सुरुवातीला असे वाटले की ही घटना एक संभाव्य अपघात होता. पण, जेडने ज्या ठिकाणावरुन जंपिंग केले; तेथील स्काय हाय स्कायडायव्हिंग सेंटरने म्हटले की ती स्कायडायव्हिंग करताना पडणे, हे जाणूनबुजून केलेले कृत्य असल्याचे दिसते. या घटनेच्या तपासात तिने वापरलेल्या उपकरणांत कोणतीही समस्या आढळून आली नाही.
जेडच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. ज्यात तिने तिच्या ब्रेकअपबाबत लिहिले आहे. यामुळेच तिने जंपिंग केल्यानंतर पॅराशूट उघडले नाही.
जेडने २०२५ मध्ये ८० हून अधिक वेळा पॅराशूटमधून जंपिंग केले होते. पोलिसांनी या घटनेबाबात अधिक काहीही भाष्य केलेले नाही. तसेच यात काही चुकीचे झाल्याचा संशयही व्यक्त केलेला नाही. तिच्या मृत्यूची घटना संशयास्पद नसल्याचे स्थानिक पोलिस डरहम कॉन्स्टेब्युलरीचे म्हणणे आहे.