

Imran Khan death rumours : रावळपिंडी येथील अदियाला कारागृह प्रशासनाने अखेर इम्रान खान यांच्याबद्दल पाकिस्तानात पसरणाऱ्या अफवांबद्दल आपले मौन सोडले आहे. इम्रान खान यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हलवल्याचा केलेला आरोप तुरुंग अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने इम्रान खान यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कारागृहातून हलवल्याचा केलेला आरोप केला होता. पाकिस्तानातील जिओ न्यूजनुसार, कारागृहातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, इम्रान खान पूर्णपणे निरोगी आहेत आणि तुरुंगातच आहेत. रावळपिंडी तुरुंग अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "त्यांच्या अडियाला तुरुंगातून हलवण्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. ते पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना पूर्ण वैद्यकीय मदत मिळत आहे."
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे की, "इम्रान खान यांना तुरुंगात पंचतारांकित सुविधा मिळतात. त्यांना पंचतारांकित हॉटेलसारखे जेवण दिले जाते आणि त्यांना पूर्ण आराम मिळतो. त्यांच्या समर्थकांनी वारंवार त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचा किंवा त्यांची प्रकृती बिघडत असल्याचा आरोप केला आहे; परंतु त्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा मेनू पहा; ते पंचतारांकित हॉटेलमध्येही उपलब्ध नाही." ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, इम्रान खान यांच्यासाठी टीव्ही आहे. ते त्यांच्या आवडीचे कोणतेही चॅनेल पाहू शकतात. त्यांच्यासाठी व्यायाम करण्याची साधने आहेत. आम्हाला जेव्हा कारागृहात ठेवण्यात आले होते तेव्हा, "आम्ही थंड जमिनीवर झोपलो, तुरुंगातील जेवण खाल्ले आणि जानेवारीमध्ये आमच्याकडे फक्त दोन ब्लँकेट होते आणि गरम पाणी नव्हते."
अडियाला कारागृहाबाहेर इम्रान खान समर्थकांच्या जोरदार निदर्शनांनंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी इम्रान खानच्या बहिणींना आणि पीटीआय नेत्यांना आश्वासन दिले आहे की त्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल. या आश्वासनानंतर, निदर्शनेही थांबली आहेत.