

Trump Venezuela Warships Trump drug cartel crackdown Nicolas Maduro response
वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ तीन युद्धनौका पाठवल्या असून त्या काही तासांत तिथे पोहोचणार आहेत. या कारवाईचे कारण अमेरिकेने ‘अंमली पदार्थांचे रॅकेट आणि त्यासंबंधित हिंसाचार रोखणे’ असे सांगितले आहे.
मात्र व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी याला तीव्र विरोध केला असून, देशभरात 4.5 दशलक्ष सैनिकांची तैनाती करत अमेरिकेच्या निर्णयाला ‘वेडसरपणाचे लक्षण’ असे संबोधले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानुसार, यूएसएस ग्रेव्हली, यूएसएस जेसन डनहॅम, आणि यूएसएस सॅम्पसन या तीन Aegis guided-missile destroyers व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ तैनात केल्या जात आहेत. ह्या युद्धनौका हवेतून, समुद्रातून आणि पाणबुडींविरुद्ध लढण्यास सक्षम आहेत.
याशिवाय 4000 मरीन सैनिक, P-8A Poseidon निगराणी विमाने आणि एक अणुपाणबुडी या मोहिमेत सहभागी आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये या सगळ्यांचा वापर अंमली पदार्थ तस्करीविरोधातील कारवायांसाठी केला जाणार आहे.
व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री इव्हान गिल यांनी अमेरिकेच्या या पावलावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “व्हेनेझुएलावर लावलेले ड्रग तस्करीचे आरोप खोटे असून अमेरिका आपली विश्वासार्हता गमावत आहे. आम्ही शांतता आणि सार्वभौमत्वाच्या मार्गाने पुढे जात आहोत. अमेरिकेची प्रत्येक धमकी हेच सिद्ध करते की ती एक स्वतंत्र राष्ट्राला वाकवू शकत नाही.”
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना जगातील मोठ्या ड्रग तस्करांपैकी एक ठरवले आहे. 8 ऑगस्ट रोजी त्यांच्या अटकेसाठीचे बक्षीस 217 कोटींवरून 435 कोटी रुपयांवर नेले गेले. याशिवाय, त्यांच्याशी संबंधित 6000 कोटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन खाजगी जेट विमानांचाही समावेश आहे.
अमेरिकेचा आरोप आहे की मादुरो यांनी फेंटानिल मिसळलेली कोकेन अमेरिका पाठवण्यासाठी ड्रग कार्टेल्सशी हातमिळवणी केली आहे. 2020 पासून मादुरो यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात नार्को-टेररिझम आणि कोकेन तस्करीचे आरोप सुरू आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ड्रग कार्टेल्सना अमेरिका आणि तिच्या शहरांसाठी मोठा धोका असल्याचे ठामपणे सांगितले आहे. त्यांनी मेक्सिकोच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांना कार्टेल्सविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र मेक्सिकोने स्पष्ट केले की ती सार्वभौमत्वाचा भंग होईल अशी कोणतीही अमेरिकी लष्करी हस्तक्षेप मान्य करणार नाही.
फेब्रुवारी 2025 मध्ये, ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाच्या 'ट्रेन दे अराग्वा', एल साल्वाडोरच्या 'MS-13', आणि मेक्सिकोतील सहा प्रमुख ड्रग कार्टेल्स यांना थेट विदेशी दहशतवादी संघटनांचा दर्जा दिला.
पूर्वी केवळ अल-कायदा किंवा इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांना हा दर्जा दिला जात असे. मात्र वॉशिंग्टनने स्पष्ट केले की हे नेटवर्क अंमली पदार्थ तस्करी, मानवी तस्करी आणि हिंसाचारामार्फत दहशतवादी संघटनांइतकेच नुकसान पोहोचवत आहेत.