

Israel Gaza Army Deployment
तेल अवीव : इस्रायल सरकारने गाझा सिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘गिडिऑन्स चेऱिऑट्स-बी (Gideon’s Chariots-B)’ नावाची मोठी लष्करी मोहीम जाहीर केली असून, यासाठी तब्बल 1.3 लाख सैनिकांची तैनाती करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 60,000 राखीव जवानांना पुन्हा सेवेत बोलावण्यात येणार आहे.
ही हालचाल टप्प्याटप्प्याने पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात 40,000 ते 50,000 सैनिक 2 सप्टेंबरपर्यंत अहवाल देतील, दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि शेवटचा टप्पा फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होईल.
इस्रायली लष्कराने गाझा सिटीवर ताबा मिळवण्याच्या तयारीला सुरुवात केली असून, सध्या शहराच्या सीमेवर लष्करी हालचाली सुरू आहेत. झैतून भागात नाहल ब्रिगेड आणि 7 वी आर्मर्ड ब्रिगेड, तर जबालिया भागात गिवाती ब्रिगेड कार्यरत आहे.
यानंतर 7 ऑक्टोबर 2025 ही नागरिकांच्या स्थलांतराची अंतिम तारीख असणार आहे. त्यानंतर इस्रायली लष्कर गाझा सिटीला चारही बाजूंनी वेढा देणार असून, मग अंतर्गत भागात प्रवेश केला जाईल.
इस्रायलने सुमारे 10 लाख लोकांचे दक्षिण गाझामध्ये पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. यासाठी शिबिरे, तंबू आणि फील्ड हॉस्पिटल्स उभारण्यात येत आहेत. खान युनिसमधील युरोपियन हॉस्पिटल पुन्हा सुरू करून तिथे मदतकार्य चालवले जाणार आहे.
या मोहिमेमध्ये 5 लष्करी विभाग आणि 12 ब्रिगेड लेव्हल टीम्स सहभागी होणार आहेत, ज्यात पायदळ, रणगाडे, तोफखाना, अभियंता आणि समर्थन युनिट्सचा समावेश आहे. गाझा विभागाच्या उत्तर व दक्षिण ब्रिगेड्स याही थेट सहभागी होतील. हा निर्णय संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत घेण्यात आला.
इस्रायलने दावा केला आहे की, सध्या 75 टक्के गाझा पट्ट्यावर त्यांचा ताबा आहे, तर उर्वरित 25 टक्के भाग म्हणजे गाझा सिटी इस्रायली नियंत्रणाबाहेर आहे. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, या भागातच हमासने अनेक इस्रायली बंदीवान ठेवले आहेत, जिथे अद्याप मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली नाही.
हमासने युद्धबंदी व कैद्यांच्या मुक्ततेस सहमती दर्शवली आहे. अमेरिका, इजिप्त व कतारच्या मध्यस्थीने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, हमास 60 दिवसांच्या युद्धबंदीत 50 इस्रायली कैद्यांपैकी वाचलेल्यांची दोन टप्प्यांत सुटका करणार आहे. मात्र इस्रायलकडून अद्याप औपचारिक प्रतिसाद नाही.
हमासचे पूर्ण निरस्त्रीकरण
सर्व बंदीवानांची सुटका
गाझामधून हामासचे लष्करी गट हटवणे
गाझावर इस्रायलचा सुरक्षा नियंत्रण
हामास किंवा पॅलेस्टिनी अथॉरिटीपासून स्वतंत्र नवीन प्रशासनाची स्थापना
युनिसेफच्या अहवालानुसार, गाझामध्ये दररोज 28 बालकांचा मृत्यू होत आहे. ऑक्टोबर 2023 पासून आजपर्यंत 18,000 पेक्षा अधिक बालकांचे बळी गेले आहेत. आतापर्यंत 188 जण भुकेने दगावले आहेत, त्यात 94 मुलांचा समावेश आहे. एकूण मृतांचा आकडा 60,933 वर पोहोचला असून 150,000 हून अधिक जखमी झाले आहेत.