US Strikes Iran: हॉर्मुझ समुद्रात तणाव वाढला; हेलिकॉप्टर पाडल्याने अमेरिकन लष्कराचे इराणवर हवाई हल्ले

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मंगळवारी अमेरिकेचे अत्याधुनिक 'अपाचे' लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष पेटला आहे.
US Strikes Iran
US Strikes Iranfile photo
Published on
Updated on

US Strikes Iran

तेहरान: हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मंगळवारी अमेरिकेचे अत्याधुनिक 'अपाचे' लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष पेटला आहे. या घटनेनंतर काही तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर प्रतिहल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणनेही चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला असून, दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत तणाव निर्माण झाला आहे.

अमेरिकेचे 'स्वसंरक्षणार्थ' हल्ले

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने इराणवर स्वसंरक्षणार्थ क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. सेंट्रल कमांडने 'एक्स'वर अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, "इराणने काल आमच्या अपाचे हेलिकॉप्टरवर केलेल्या बेकायदेशीर हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणच्या अवाजवी आक्रमकतेला अमेरिकेने दिलेले हे चोख आणि प्रमाणबद्ध उत्तर आहे."

US Strikes Iran
US-Iran Israel War|इस्रायल नष्ट होईपर्यंत मध्य पूर्वेत शांतता नांदणार नाही : इराणने युद्धाच्या आगीत ओतले तेल

अपाचे हेलिकॉप्टर कसे कोसळले?

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे 'अपाचे' हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर या वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, 'रॉयटर्स'ने एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या एका 'आत्मघाती ड्रोन'ने धडक देऊन हे हेलिकॉप्टर पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैमानिकांची थरारक सुटका

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्यातील दोन वैमानिक समुद्रात पडले होते. अमेरिकेच्या नौदलाने एका अत्याधुनिक मोहिमेद्वारे या दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाहेर काढले. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ हे वैमानिक दोन तास पाण्यात अडकले होते, तिथे नौदलाच्या २४ फुटी 'चालकविरहित नौकेने' त्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. दोघेही सुरक्षित असून त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही.

ट्रम्प यांचे घूमजाव आणि आक्रमक पवित्रा

सुरुवातीला ट्रम्प यांनी या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला होता. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, "पायलट सुरक्षित असल्याने ही फार मोठी गोष्ट नाही." मात्र, काही तासांतच त्यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीव्र संताप व्यक्त केला. "इराणने हॉर्मुझ समुद्रात गस्त घालत असलेले आमचे अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर पाडले आहे. अमेरिका या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल," असे ट्रम्प यांनी जाहीर केले.

इराणचा बचावात्मक पवित्रा, पण अमेरिकेला इशारा

दुसरीकडे, इराणने आम्ही जाणीवपूर्वक अमेरिकेचे हेलिकॉप्टर लक्ष्य केले नसल्याचा दावा केला आहे. इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, हॉर्मुझ समुद्रातील संवेदनशील परिस्थिती पाहता हा एक अपघात असू शकतो, यात आमचा कोणताही पूर्वग्रहदूषित हेतू नव्हता. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, "परकीय सैन्याने आमच्या सीमेजवळ वावरताना स्वतःच्या चुका, अपघात किंवा दोन्ही बाजूंच्या गोळीबाराचा धोका लक्षात ठेवावा. हा धोका टाळायचा असेल, तर त्यांनी हा परिसर सोडून जाणे हाच उत्तम पर्याय आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र नसून इराण आणि ओमानची सामायिक हद्द आहे." इराणच्या लष्कराने अमेरिकेला इशारा दिला आहे की, या अपघाताचा बहाणा करून जर अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई लादण्याचा प्रयत्न केला, तर इराणकडून त्याला निर्णायक आणि विध्वंसक उत्तर दिले जाईल.

US Strikes Iran
PoK Protest Violence : 'पीओके'मध्ये आंदोलकांवर सुरक्षा दलांचा गोळीबार; ३० हून अधिक ठार, २०० जण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news