

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लष्करी अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या सिनेटमध्ये अपयशी ठरला. सिनेटने ४९ विरुद्ध ५० मतांनी युद्धाधिकार (वॉर पॉवर्स रिझोल्युशन) संबंधीचा ठराव फेटाळला. या ठरावानुसार काँग्रेसची स्पष्ट मंजुरी नसताना इराणमधील लष्करी कारवायांमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, अमेरिकेने इराणवर नव्या हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. अमेरिकन लष्कराने बुधवारी इराणमधील अनेक ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केल्याचे जाहीर केले. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पेंटागॉनने सांगितले आहे. या नव्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे.
युद्धाधिकार मर्यादित करण्याच्या ठरावाला रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स, लिसा मर्कोव्स्की आणि रँड पॉल यांनी डेमोक्रॅट्सच्या बाजूने मतदान केले. मात्र डेमोक्रॅट पक्षाचे जॉन फेटरमन यांनी रिपब्लिकन सदस्यांसोबत मतदान करत ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ठराव एका मताने फेटाळला गेला. रिपब्लिकन नेते मिच मॅकॉनेल हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानाला अनुपस्थित होते.
इराणविरुद्धचे युद्ध आता पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. पेंटागॉनच्या आकडेवारीनुसार, या युद्धात आतापर्यंत १८ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून ४५० हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. `
पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, युद्ध सुरू ठेवण्यासाठी ८० अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. यापूर्वीच या मोहिमेवर ३७ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाने (हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्ह) ट्रम्प प्रशासनाने युद्ध थांबवावे, असा ठराव दोनदा मंजूर केला आहे. जुलैच्या अखेरीस हा ठराव २१४ विरुद्ध २०८ मतांनी मंजूर झाला होता. मात्र हा ठराव कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसल्याने तो राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीसाठी पाठविला जात नाही. असोसिएटेड प्रेस-एनओआरसी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नव्या जनमत चाचणीनुसार, अमेरिकेतील सुमारे दोनतृतीयांश नागरिकांना हे युद्ध योग्य वाटत नाही. केवळ ३३ टक्के नागरिकांनी युद्धाचे समर्थन केले आहे. डेमोक्रॅट आणि अपक्ष मतदारांबरोबरच सुमारे ३७ टक्के रिपब्लिकन मतदारांनीही युद्धाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.