पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ट्रम्प यांनी एक्स, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk) आणि रिपब्लिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे माजी उमेदवार विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गर्व्हंमेंट एफिशिएन्सीचे प्रमुख बनवले आहे. अब्जाधीश उद्योगपती मस्क हे माजी रिपब्लिकन पक्षाचे विवेक रामास्वामी यांच्यासोबत या विभागाचे सह-नेतृत्व करतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. विवेक रामास्वामी हे मूळ भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत.
त्यांच्या नियुक्तीची घोषणा करताना ट्रम्प यांनी एलन मस्क यांना 'ग्रेट एलन मस्क' असे म्हटले आहे. तर विवेक रामास्वामी यांचा देशभक्त अमेरिकी असा उल्लेख केला आहे. विवेक रामास्वामी यांनी दिलेली जबाबदारी प्रभावीपणे राबवणार असल्याचे संकेत दिले आहेत आणि ट्रम्प यांनाही हेच हवे आहे.
ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे होस्ट आणि आर्मीमध्ये सेवा बजावलेले पीट हेगसेथ यांची संरक्षण सचिव तर जॉन रॅटक्लिफ यांची राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्त केली आहे.
रामास्वामी यांनी ट्रम्प यांना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पाठिंबा दिला आहे. अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून परत पाठवून देण्याची ट्रम्प यांची योजना असून त्यांच्या या भूमिकेते रामास्वामी यांनी समर्थन केले आहे. ३८ वर्षीय रामास्वामी ओहियो येथे रिपब्लिकन पक्षाच्या पहिल्या नामांकनाच्या यादीत चौथ्या स्थानावर राहिले होते. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.
विवेक गणपती रामास्वामी यांचा जन्म ९ ऑगस्ट १०८५ रोजी सिनसिनाटी, ओहियो येथे केरळमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या तमिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. रामास्वामी यांनी रोमन कॅथोलिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी अनेकदा डेटोन येथील एका हिंदू मंदिराला त्यांच्या कुटुंबासह भेट दिली आहे. येल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी मिळवली.
रामास्वामी हेज फंड गुंतवणूकदार म्हणून काम करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी येल येथून कायद्याची पदवी प्राप्त करण्यापूर्वीच लाखो डॉलर्स कमावले होते. २०१४ मध्ये त्यांनी स्वतःची बायोटेक कंपनी, रोइव्हंट सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी औषधांसाठी मोठ्या कंपन्यांकडून पेटंट्स विकत घेतले. जे अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. त्यांनी २०२१ मध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला. २०२३ मध्ये, फोर्ब्स मासिकाने रामास्वामी यांची संपत्ती ६३० दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.