

नवी दिल्ली: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे इलॉन मस्कच्या स्टारलिंक कंपनीचा भारत प्रवेश होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील उद्योगसंबंध वाढणार आहेत. तर एलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. याचा फायदा ‘एक्स’ कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला होणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून स्टारलिंक कंपनी भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावर आता भारताचे दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वक्तव्य करुन संकेत दिले. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही कंपनीला परवाना देण्यास तयार आहोत. स्टारलिंक असो किंवा इतर कोणतीही कंपनी, प्रत्येकाला आमच्या सुरक्षा आणि इतर नियमांचे पालन करण्यास तयार राहावे लागेल.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामध्ये ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क यांचा मोठा वाटा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मस्क यांनी मोठी मेहनत घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विजयी भाषणात वेळोवेळी एलॉन मस्क यांचा उल्लेख केला. त्यानंतर आता ट्रम्प यांची सत्ता आल्याने मस्क यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भारतात ट्रम्प यांची कंपनी येण्यासाठी ट्रम्प यांची भूमिका महत्वाची असू शकते. जर स्टारलिंक कंपनीने भारतात सेवा द्यायला सुरुवात केली तर उपग्रह सेवा क्षेत्रात, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांसारख्या भारतीय कंपन्यांना या जागतिक कंपनीशी स्पर्धा करावी लागेल.
सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागासोबत झालेल्या बैठकीत स्टारलिंकने सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा परवान्यासाठी डेटा लोकॅलायझेशन आणि सुरक्षेशी संबंधित नियम स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, त्यासाठीचा करारनामा कंपनीने अद्याप दाखल केलेला नाही. सुरक्षेशी संबंधित नियमांनुसार, देशात कार्यरत सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपन्यांना सर्व डेटा देशांतर्गत ठेवणे बंधनकारक आहे. स्टारलिंकला गुप्तचर संस्थांना आवश्यक असल्यास डेटा कसा मिळेल हे देखील स्पष्ट करावे लागेल.
स्टारलिंकने ऑक्टोबर २०२२ मध्ये या परवान्यासाठी अर्ज केला होता. यानंतर, कंपनीने स्पेस रेग्युलेटर, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरकडून मंजुरीसाठी अर्ज देखील केला. मात्र, अंतिम मंजुरीसाठी अतिरिक्त तपशीलांची मागणी केली जात आहे.
भूमिगत केबल्स किंवा मोबाइल टॉवरवर अवलंबून असलेल्या पारंपारिक इंटरनेट प्रदात्या कंपन्यांपेक्षा स्टारलिंकची सेवा वेगळी आहे. स्टारलिंक कंपनी वापरकर्त्यांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी उपग्रहांचे नेटवर्क वापरते. स्टारलिंकचे मुख्य उद्दिष्ट एकतर दुर्गम असलेल्या किंवा चांगले ब्रॉडबँड पर्याय नसलेल्या भागात हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करणे हे आहे, जे ग्रामीण भागात आणि पारंपारिक इंटरनेट पायाभूत सुविधा उभारणे कठीण असलेल्या ठिकाणांसाठी विशेषतः उपयुक्त ठरते. स्टारलिंकची इंटरनेट सेवा खूप वेगवान आहे. सेकंदाला २५ एमबी ते २५० इंटरनेट स्पीड स्टारलिंक प्रदान करते.
स्टारलिंक अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये आधीच उपलब्ध आहे. स्पेन, इटली आणि मेक्सिकोमध्येही आपल्या सेवांचा विस्तार केला आहे. याव्यतिरिक्त, बेल्जियम, आयर्लंड, स्वित्झर्लंड आणि डेन्मार्कसह पोर्तुगाल, ब्राझील, ऑस्ट्रिया आणि नेदरलँड्स सारख्या देशांमध्येही स्टारलिंकने प्रवेश केला आहे.