पुढारी ऑनलाईन डेस्क : US Air Strike : अमेरिकन सैन्याने शनिवारी आफ्रिकन देश सोमालियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी X पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘मी सोमालियातील ISIS दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. हे दहशतवादी गुहांमध्ये लपले होते, पण आम्ही त्यांच्यावर अचूक हल्ला केला. या एअर स्टाईकमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक असणा-या ISIS आम्ही दहशतवाद्यांना शोधून ठार करणार आहे,’ असा इशारा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, ‘अमेरिकन सैन्य अनेक वर्षांपासून इसिसच्या हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे. पण बायडेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पूर्ण करण्यासाठी पुरेशी जलद कारवाई केली नाही. पण मी राष्ट्राध्यक्ष होताच ही कामगिरी हाती घेतली असून या दशतवाद्यांना शोधून शोधून ठार करण्याचे आदेश दिले. सोमालियातील एअर स्ट्राईक हा याच योजनेचा भाग आहे.’
वास्तविक, आफ्रिकन देशात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सोमालियामधील इसिस संघटनेचे दहशतवादी जबाबदार असल्याचे बोलले जाते. एका माहितीनुसार, सोमालियामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांची संख्या शेकडोंमध्ये असल्याचा अंदाज आहे, जे पंटलँडच्या बारी प्रदेशातील कैल मिस्कट पर्वतांमधील गुहांमध्ये लपले आहेत.