

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत (US Election 2024 Result) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होतील. दरम्यान, विजयासमीप पोहोचल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना संबोधित करताना अमेरिकेतील जनतेचे आभार मानले.
अमेरिकेतील जनतेने इतिहास घडवला आहे. या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाने नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे, अशी पहिली प्रतिक्रिया देत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील जनतेचे आभार मानले. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बहुमताजवळ पोहोचताच ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना संबोधित केले. हा अविश्वसनीय राजकीय विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच काउंटी कन्व्हेन्शन सेंटर येथे संबोधित करताना ट्रम्प यांनी त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि कुटुंबीयांचेही आभार मानले. "हा एक राजकीय विजय आहे; जो आपल्या देशाने याआधी कधीही पाहिला नव्हता. तुम्ही ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल मला अमेरिकन जनतेचे आभार मानायचे आहेत. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढत राहीन. मी माझ्या शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढत राहीन. आमची मुले आणि तुम्हाला हवी असलेली अमेरिका मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. हा खऱ्या अर्थाने अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल." असे ट्रम्प यांनी आपल्या विजयी भाषणात म्हटले.
अमेरिकेतील जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया आणि नॉर्थ कॅरोलिना या स्विंग स्टेट्समध्ये ट्रम्प विजयी झाले आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची (US Election 2024 Result) मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या निकालात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आघाडीवर आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस पिछाडीवर आहेत. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना २६६ इलेक्ट्रोल मते मिळाली आहेत. तर हॅरिस यांनी २१९ मते मिळवली आहेत.