

US China trade truce
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचा व्यापार संघर्ष टाळण्यासाठी आयात शुल्कावरील सवलतीला (tariff truce) आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे जगातील या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संभाव्य जकात युद्ध १० नोव्हेंबरपर्यंत टळले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही अमेरिकन वस्तूंवरील अतिरिक्त शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ट्रुथ सोशलवरील (Truth Social) एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, "मी नुकतेच एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे चीनवरील शुल्क स्थगितीला आणखी ९० दिवसांची मुदतवाढ मिळेल. करारातील इतर सर्व घटक पूर्वीप्रमाणेच राहतील." यापूर्वी, बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील शुल्क सवलतीची मुदत १२ ऑगस्ट रोजी संपणार होती. गेल्या महिन्यात स्टॉकहोममध्ये अमेरिका आणि चीनच्या व्यापार अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ही मुदतवाढ अपेक्षित होती. जर ही मुदतवाढ मिळाली नसती, तर एप्रिलमध्ये व्यापार संघर्षाच्या वेळी दिसलेल्या उच्चांकी पातळीवर अमेरिकेने चिनी वस्तूंवरील आयात शुल्क पुन्हा लागू केले असते. या दोन्ही देशांनी मे महिन्यात जिनिव्हा येथे झालेल्या चर्चेनंतर ९० दिवसांसाठी बहुतेक शुल्क स्थगित करण्यास सहमती दर्शवली होती.
या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेला हादरा देणारा तणाव वाढण्याची भीती तूर्तास कमी झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिकेने चिनी आयातीवरील शुल्क १४५% पर्यंत वाढवल्याने व्यापार संघर्ष अधिक तीव्र झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन उत्पादकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या 'रेअर अर्थ' खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. मे महिन्यात झालेल्या ९० दिवसांच्या मूळ करारानुसार, अमेरिकेने चिनी वस्तूंवरील शुल्क ३०% पर्यंत कमी केले होते, तर चीनने अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क १०% पर्यंत कमी करून 'रेअर अर्थ मॅग्नेट'ची निर्यात पुन्हा सुरू केली होती.
या मुदतवाढीमुळे दोन्ही देशांना फेंटॅनिल तस्करीशी संबंधित अमेरिकी शुल्क आणि चीनने रशिया व इराणकडून खरेदी केलेल्या प्रतिबंधित तेलासारख्या प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. या निर्णयामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस ट्रम्प यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी चीन दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याच काळात दक्षिण कोरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेलाही ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता आहे.