US strikes Iran : इराणची अणुबॉम्ब क्षमता नष्ट करणे आणि जगातील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या प्रमुख देशाकडे असलेला अण्वस्त्रांचा धोका संपवणे हे आमचे उद्दिष्ट होते. मध्य-पूर्वेत दादागिरी करणाऱ्या इराणने आता शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. नाहीतर भविष्यात हल्ले अधिक भीषण करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तीन अणुस्थळांना लक्ष्य करून सुरू केलेल्या लष्करी कारवाईबाबत रात्री १० वाजता (स्थानिक वेळेनुसार) (भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता) राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला आहे. दुसरे कोणतेही सैन्य हे करू शकत नाही. असे पाऊल उचलावे लागू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले, परंतु आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. आता इराणने शांततेच्या मार्गावर परतले पाहिजे.
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की इराणकडे अजूनही शांततेच्या मार्गावर परतण्यासाठी वेळ आहे. त्यांना हे युद्ध संपवावे लागेल. जर इराणने आताही हल्ला केला तर आम्हीही हल्ला करू. जर शांतता नसेल तर विनाश होईल. अद्याप सर्व लक्ष्यांवर हल्ला झालेला नाही. आम्ही पश्चिम आशियात दादागिरी दाखवणाऱ्या इराणच्या अणुप्रकल्पांना पूर्णपणे नष्ट करू.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला "नेत्रदीपक लष्करी यश" असल्याचे सांगितले. ट्रम्प म्हणाले, "आजच्या रात्री, मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की या हल्ल्यामुळे इराणच्या मुख्य अणुस्थळांना पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. इराणची अणु क्षमता कायमची संपवणे आणि जगाला अणु धोक्यापासून वाचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या ४० वर्षांपासून इराणने आमच्या अनेक नागरिकांचा जीव घेतला आहे. इराणचा जनरल कासिम सोलेमानी याने अनेकांची हत्या केली. मी खूप आधीच ठरवलं होतं की हे अधिक काळ सहन करणार नाही. आता हे थांबणारच आहे," असे ट्रम्प यांनी सांगितले.
'आजची रात्र सर्वात कठीण आणि कदाचित सर्वात घातक होती' असे ट्रम्प म्हणाले. लक्षात ठेवा, अजूनही बरेच लक्ष्य शिल्लक आहेत. आजची रात्र सर्वात कठीण आणि कदाचित सर्वात घातक होती,' असेही ट्रम्प यांनी सांगितले.