

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने येमेनमधील हुथी बंडखोरांवर हवाई हल्ले केले. यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. लाल समुद्रात जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी हल्ल्या झाल्याची माहिती हुथींनी दिली.
ट्रम्प यांनी हुथींचा मुख्य समर्थक असलेल्या इराणलाही इशारा दिला आहे की, त्यांनी या गटाला ताबडतोब पाठिंबा देणे थांबवावे. शनिवारी, ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांना येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. ही माहिती देताना, ट्रम्प यांनी आश्वासन दिले की जोपर्यंत इराण समर्थित हुथी बंडखोर महत्त्वाच्या सागरी कॉरिडॉरवरील जहाजांवर हल्ले करणे थांबवत नाहीत तोपर्यंत अत्यधिक प्राणघातक शक्तीचा वापर केला जाईल. आमचे सैनिक सध्या अमेरिकन जहाजे, हवाई आणि नौदलाचे संरक्षण करण्यासाठी आणि जलवाहतुकीचे स्वातंत्र्य पुनर्संचयित करण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत आहेत, असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी सर्व हुथी बंडखोरांना इशारा दिला आहे. तुमची वेळ संपली आहे. तुम्हाला आजपासूनच हल्ले थांबवावे लागतील. कोणतीही दहशतवादी शक्ती अमेरिकन व्यावसायिक आणि नौदल जहाजांना जगातील जलमार्गांवरून प्रवास करण्यापासून रोखू शकणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.