

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनने आपल्या स्वातंत्र्य दिनी कुर्स्क येथील अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. युक्रेन आपला ३४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच हे हल्ले झाले. रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रात्रभरात अनेक ऊर्जा आणि वीज केंद्रांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. कुर्स्क येथील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आग लागली होती; परंतु वेळेवर ती नियंत्रणात आणण्यात आली असून जीवितहानीचे वृत्त नाही.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी युक्रेनचे ९५ ड्रोन पाडले. त्याचवेळी, रशियानेही युक्रेनवर ७२ ड्रोन आणि एका क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केला, त्यापैकी ४८ ड्रोन युक्रेनच्या हवाई दलाने नष्ट केले. या हल्ल्यांच्या दरम्यान, रशियाच्या लेनिनग्राड भागातील उस्त-लुगा बंदरावरही आग लागली.
किव्हच्या स्वातंत्र्य चौकातून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे देशवासियांना संबोधित केले. ते म्हणाले की, "युक्रेन असे भविष्य घडवत आहे, जिथे सुरक्षा आणि शांततेने जीवन जगणे शक्य होईल. आपले भविष्य केवळ आपल्याच हातात आहे" . अलीकडेच झालेल्या अमेरिका-रशिया अलास्का बैठकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, जग युक्रेनचा आदर करते आणि त्याला समानतेने पाहते. या संघर्षात युक्रेनला जगाचा पाठिंबा मिळत आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.