

पुढारी ऑनलाईन डेस्क
डेन्मार्कची (Denmark) राजधानी कोपनहेगन (Copenhagen) येथील इस्रायल दूतावासाच्या परिसरात दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या प्रकरणी डेन्मार्क पोलीस तपास करत आहेत. कोपनहेगनच्या उत्तरेकडील भागात इस्रायल दूतावास परिसरात दोन स्फोट झाले असल्याची माहिती डेन्मार्क पोलिसांनी दिली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही आणि ते घटनास्थळी प्राथमिक तपास करत आहेत, असे कोपनहेगन पोलिसांनी सोशल मीडिया X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या भागाची घेराबंदी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्बस्फोट आणि इस्रायली दूतावास यांच्यात काही संबंध आहे की नाही हे आताच काही सांगू शकत नाही, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
कोपनहेगनच्या उत्तरेकडील हेलेरप उपनगरात इस्रायलसह इराण, थायलंड, तुर्की आणि रोमानिया या देशांची दुतावास आहेत. स्टॉकहोममधील इस्रायली दूतावासा जवळ संशयास्पद गोळीबार झाला; त्याच रात्री कोपनहेगनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडल्याचे स्वीडिश माध्यमांनी म्हटले आहे.
मध्य पूर्वेत तणाव वाढल्याच्या दरम्यान या घटना घडल्या आहेत. इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली आणि इस्रायलने इराणला या हल्ल्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. इराणने (Iran) इस्रायलवर मंगळवारी रात्री सुमारे २०० क्षेपणास्त्रे (missile attack) डागली. इराणच्या क्षेपणास्त्रांनी मोसादचे मुख्यालय, इस्त्रायली हवाई तळाला लक्ष्य केले.