

पुढारी ऑनलाईन डेस्क : Turkiye Resort Fire : तुर्कीच्या बोलू पर्वतरांगांमधील ग्रँड कार्तलकाया रिसॉर्टमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान 66 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुर्कीचे मंत्री अली येर्लिकाया यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘तुर्कीच्या बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील एका इमारतीमध्ये पहाटे 3.27 वाजता आग लागली. आगीत दुर्देवाने 66 पर्यटकांनी जीव गमावला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे. रिसॉर्ट आगीच्या ज्वालांनी वेढलेले असताना अनेक लोकांनी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच 28 रुग्णवाहिकांनाही तेथे पाठवण्यात आले.’
दुर्घटनेवेळी हॉटेलमध्ये तब्बल 234 पाहुणे थांबले होते. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक फिरण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यावेळी ते या हॉटेमध्ये मुक्कामी होते,’ अशी माहिती बोलू प्रांताचे गव्हर्नर अब्दुलअजीझ आयदिन यांनी दिली.