

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी सी : इराण हा संपूर्ण देश एका रात्रीत बेचिराख करू शकतो आणि ती रात्र कदाचित उद्याची असू शकते, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. इराणशी 45 दिवसांचा युद्धविराम करण्याचा प्रस्ताव पुढे आला असला तरी तो इराणने फेटाळून लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा इशारा अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
ट्रम्प आणि व्हाईट हाऊसच्या इतर अधिकार्यांनी सोमवारी घेतलेल्या या पत्रकार परिषदेचा भर, आठवड्याच्या शेवटी एका अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेचे नवीन तपशील सादर करण्यावर होता. ट्रम्प यांच्यासह इतरांनी अत्यंत नाट्यमय, चित्रपटासारख्या शैलीत यावेळी त्याचे वर्णन केले.
इराणने मंगळवारपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी पुन्हा दिली. दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी कूटनीतिक प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी त्याला महत्त्वाचे पाऊल असे म्हटले. परंतु ते पुरेसे नाही, असेही स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत संरक्षणमंत्री पीट हेगसेट यांनी ट्रम्प यांच्या निर्देशानुसार अमेरिका इराणवर अधिक तीव्र हल्ले करणार असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशानुसार, आज या मोहिमेच्या पहिल्या दिवसानंतरचे सर्वात मोठे हल्ले होतील. उद्या आजच्यापेक्षा अधिक हल्ले होतील. कशाची निवड करावयाची हा इराणचा निवडीचा पर्याय असेल, असे ते म्हणाले. ट्रम्प किंवा सीआयएचे संचालक रॅटक्लिफ यांनी एफ-15 ए विमान कसे पाडले गेले याबद्दल काहीही सांगितले नाही; त्यांचे लक्ष बचाव मोहिमेवर होते. ट्रम्प यांनी वृत्तमाध्यमांवर आणि एका माहिती लीक करणार्या व्यक्तीवर संताप व्क्त केला.
शुक्रवारी एफ-15 ए चा एक वैमानिक सुरक्षितपणे वाचवला गेला असल्याची माहिती दुसरा सदस्य सुरक्षित होण्यापूर्वीच उघड करण्यात आली होती. ज्या मीडियाने ही बातमी दिली आहे, तिच्याकडे जाऊन आम्ही त्याचा शोध लावू, असेही ते म्हणाले.
शांततेसाठी ठेवल्या 10 जाचक अटी
मध्य पूर्वेतील वाढता तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने मांडलेला युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने अधिकृतपणे फेटाळून लावला आहे. केवळ तात्पुरती युद्धबंदी नको, तर कायमस्वरूपी शांतता हवी, अशी भूमिका घेत इराणने अमेरिकेसमोर 10 अटींचे एक मागणीपत्र ठेवले आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था इर्नाने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पाकिस्तानच्या माध्यमातून हे उत्तर अमेरिकेला पाठवण्यात आले.
इराणच्या प्रमुख मागण्या
* तात्पुरत्या शस्त्रसंधीऐवजी प्रादेशिक संघर्ष कायमचा थांबवावा.
* होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासासाठी इराणच्या अटींनुसार नवा नियम लागू करणे.
* अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व आर्थिक, व्यापारी निर्बंध तत्काळ मागे घेणे.
* युद्धग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी सहकार्य आणि नुकसानभरपाई.
* मध्य पूर्वेतील देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप थांबवणे.