Donald Trump threat case | ट्रम्प यांना धमकी; एफबीआय अधिकाऱ्याविरोधात आरोपपत्र

Donald Trump threat case |
Donald Trump threat case | ट्रम्प यांना धमकी; एफबीआय अधिकाऱ्याविरोधात आरोपपत्र
Published on
Updated on

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : एफबीआयचे माजी संचालक जेम्स बी. कोमी यांच्यावर २०२५ मधील एका सोशल मीडिया पोस्टद्वारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिल्याचा आरोप असून फेडरल ग्रँड ज्युरीने त्या अनुषंगाने आरोपपत्र दाखल केले आहे. कोमी यांनी मात्र व्हिडीओ निवेदनाद्वारे स्वतःला निर्दोष घोषित केले असून सध्याच्या न्याय विभागावर टीका केली आहे.

उत्तर कॅरोलिनातील फेडरल ग्रँड ज्युरीने दाखल केलेले हे आरोपपत्र कोमी यांच्याविरोधातील दुसरे फौजदारी प्रकरण आहे. ट्रम्प यांचे दीर्घकाळचे राजकीय विरोधक असलेल्या कोमी यांच्याविरोधात न्याय विभागाने उचललेले हे नवे पाऊल मानले जात आहे. तीन पानी आरोपपत्रात नमूद केलेल्या दाव्यानुसार परिस्थितीची माहिती असलेल्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्यातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इजा पोहोचवण्याचा गंभीर हेतू व्यक्त होत असल्याचे वाटू शकते, अशी शंख शिंपल्याची मांडणी केली होती.

कोमी यांचा प्रतिवाद

कोमी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ निवेदनात “हे इथेच संपणार नाही. मी निर्दोष आहे, मला भीती नाही आणि स्वतंत्र फेडरल न्यायव्यवस्थेवर माझा अजूनही विश्वास आहे.” कोमी यांनी यापूर्वी असेही सांगितले होते की, समुद्रकिनारी फिरताना त्यांना ही शंखांची रचना दिसली होती. त्यांनी स्वतः ती मांडणी केलेली नव्हती. कोमी यांच्यावर राष्ट्राध्यक्षांना धमकी देणे आणि धमकीचा संदेश सर्वदूर पाठवणे, अशा आरोपांचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

मंगळवारी पत्रकार परिषदेत कार्यवाह ॲटर्नी जनरल टॉड ब्लांच यांना कोमी यांनी प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्षांना इजा करण्याचा हेतू होता याचे पुरावे कोणते, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

जुना संघर्ष पुन्हा समोर

कोमी यांची एफबीआय संचालक म्हणून नियुक्ती माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती. २०१६ च्या निवडणुकीत ट्रम्प प्रचार मोहिमेचे रशियाशी संबंध तपासण्याच्या चौकशीदरम्यान ट्रम्प यांनी २०१७ मध्ये त्यांना पदावरून हटवले होते. तेव्हापासून ट्रम्प यांनी कोमी यांच्यावर वारंवार कारवाईची मागणी केली आहे. काही कायदेपंडितांच्या मते, केवळ शंखांवरील आकड्यांच्या पोस्टवरून गंभीर धमकी सिद्ध करणे न्याय विभागासाठी कठीण जाईल.

‘८६ ४७‘‌ ‌ पोस्टमुळे वाद

हे आरोप कोमी यांनी २०२५ मध्ये सोशल मीडियावर ( इन्स्टाग्राम) पोस्ट केलेल्या एका छायाचित्रावर आधारित आहेत. त्या छायाचित्रात समुद्रकिनाऱ्यावर शंख-शिंपले मांडून त्या मांडणीतून ‌‘८६ ४७‌‘ असे लिहिलेले दिसत होते. ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असल्याने ‌‘४७‌‘ हा संदर्भ त्यांच्याशी जोडला गेला. ‌‘८६‌‘ या शब्दाचा अर्थ एखाद्याला हटवणे, त्याच्यावर बंदी घालणे किंवा बाहेर काढणे असा होऊ शकतो; मात्र अमेरिकन स्लँगमध्ये त्याचा अर्थ “मारून टाकणे” असाही घेतला जातो. त्यामुळे या पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. टीका सुरू झाल्यानंतर कोमी यांनी ती पोस्ट त्वरित हटवली होती.

अटक वॉरंट जारी

फेडरल अधिकाऱ्यांनी कोमी यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. ते स्वतःहून शरण येतील की सार्वजनिक अटक होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा खटला उत्तर कॅरोलिनाच्या पूर्व जिल्ह्यातील यू.एस. डिस्ट्रिक्ट जज लुईस फ्लॅनगन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांची नियुक्ती माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news