Sergio Gor US Ambassador to India
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांचे निकटवर्तीय आणि व्हाईट हाऊसचे पर्सोनल डायरेक्टर सर्जिओ गोर यांची भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांच्यावर दक्षिण आणि मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोर हे ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी सर्जिओ गोर यांना भारताचे पुढील राजदूत आणि दक्षिण व मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणून बढती देत आहे. सर्जिओ आणि त्यांच्या टीमने विक्रमी वेळेत आपल्या संघीय सरकारच्या प्रत्येक विभागात जवळपास ४,००० 'अमेरिका फर्स्ट' विचारांच्या देशभक्तांची नियुक्ती केली आहे. आमची खाती आणि संस्था ९५ टक्क्यांहून अधिक भरल्या आहेत!"
गोर यांनी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्यासोबत 'विनिंग टीम पब्लिशिंग' या प्रकाशन संस्थेची सह-स्थापना केली आहे. ट्रम्प कुटुंबाच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यात राष्ट्राध्यक्षांची दोन पुस्तके प्रकाशित करण्यापासून ते ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या सर्वात मोठ्या 'सुपर पीएसी'पैकी (राजकीय कृती समिती) एक चालवण्यापर्यंतच्या कामांचा समावेश आहे.
ट्रम्प म्हणाले, "सर्जिओ माझा एक चांगला मित्र आहे, जो अनेक वर्षांपासून माझ्यासोबत आहे. त्याने माझ्या ऐतिहासिक अध्यक्षीय मोहिमांमध्ये काम केले, माझी सर्वाधिक खपाची पुस्तके प्रकाशित केली आणि आमच्या चळवळीला पाठिंबा दिला." ते पुढे म्हणाले, "जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रदेशासाठी, माझा अजेंडा पूर्ण करण्यासाठी आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी माझ्याकडे अशी व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे, ज्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू शकेन. सर्जिओ एक अविश्वसनीय राजदूत ठरतील."
या नियुक्तीनंतर गोर यांनी आभार व्यक्त केले. "या प्रशासनाच्या कार्यातून अमेरिकन जनतेची सेवा करण्यापेक्षा मला कशाचाही जास्त अभिमान वाटला नाही! अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असेल," असे गोर यांनी 'एक्स'वर म्हटले.
गोर हे एरिक गार्सेटी यांची जागा घेतील. गार्सेटी यांनी ११ मे २०२३ ते २० जानेवारी २०२५ पर्यंत राजदूत म्हणून काम पाहिले. गार्सेटी यांच्या आधी, केनेथ जस्टर हे २३ नोव्हेंबर २०१७ ते २० जानेवारी २०२१ या काळात या पदावर होते. गार्सेटी यांच्या जाण्यानंतर, २० जानेवारी २०२५ पासून अंतरिम प्रभारी जॉर्गन के. अँड्र्यूज हे भारतातील अमेरिकन दूतावासाचे नेतृत्व करत आहेत.