

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डीसी : डोनाल्ड ट्रम्प प्रशासन सध्या इराणविरुद्धच्या युद्धाबाबत ‘युद्ध संपले’ असा ठाम दावा करत असताना प्रत्यक्षात रणांगणावर परिस्थिती अजूनही तणावपूर्णच आहे. अध्यक्ष ट्रम्प आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या राजकीय संकटावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसते. परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा दावा केला. प्रत्यक्ष परिस्थिती विरुद्ध दिसते.
युद्धविरामानंतरही संघर्ष कायम
एक महिन्यापूर्वी युद्धविराम लागू झाला तेव्हा ट्रम्प यांनी इराणने आपला अणू कार्यक्रम थांबवला नाही किंवा होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली केली नाही, तर अमेरिकेचे हवाई हल्ले पुन्हा सुरू होतील, असा इशारा दिला होता; मात्र आता रुबिओ म्हणतात की, युद्ध संपले आहे. त्यांनी सांगितले की, सामुद्रधुनी खुली करण्याचे प्रयत्न हे संरक्षणात्मक आणि मानवीय स्वरूपाचे आहेत. त्याच दिवशी ट्रम्प यांनी जहाजांना मार्गदर्शन करण्याची मोहीम थोड्या काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. वस्तुतः ती मोहीम नुकतीच सुरू झाली होती. तथापि, अमेरिकेने इराणवर आर्थिक दबाव कायम ठेवण्यासाठी नौदल नाकेबंदी सुरूच ठेवली आहे.
व्हाईट हाऊसच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
व्हाईट हाऊस युद्ध संपल्याचा दावा करत असले, तरी वास्तव वेगळे आहे. क्षेपणास्त्रांचा मारा अजूनही सुरू आहे आणि दोन्ही देश सामुद्रधुनीवरील नियंत्रणाचा दावा करत आहेत. 38 दिवसांच्या लढाईत अमेरिकेने सुमारे 13,000 लक्ष्यांवर हल्ले केल्याचा पेंटॅगॉनचा अंदाज आहे. मात्र, केवळ हल्ले करणे हे उद्दिष्ट नव्हते.
राजकीय दबाव आणि भूमिका बदल
ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढत आहे. वॉर पॉवर्स अॅक्टअंतर्गत 60 दिवसांनंतर काँग्रेसची परवानगी आवश्यक आहे. त्यावरून ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये मतभेद आहेत. चीन दौर्यापूर्वी युद्ध संपल्याचे दाखवण्याची गरज अमेरिकेला आहे. यामुळेच ‘युद्ध संपले’ असा दावा करण्यात येत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. ट्रम्प यांनीही भाषेत बदल केला आहे. त्यांनी या संघर्षाला ‘मिनी वॉर’, ‘एक्सकर्शन’ किंवा ‘डिटूर’ असे संबोधले आहे. जणू काही हा लष्करी संघर्ष नसून एक छोटा व्यत्यय आहे. पूर्वी अमेरिकेची रणनीती स्पष्ट होती. लष्करी ताकद दाखवून इराणला चर्चेस भाग पाडणे. मात्र, आता प्रशासन आर्थिक निर्बंधांवर भर देत आहे. रुबिओ म्हणाले की, अमेरिका इराणच्या कमकुवत अर्थव्यवस्थेचे उत्पन्न रोखत आहे.
सामुद्रधुनीवर संघर्ष कायम
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवत तेल आणि मालवाहतूक अडवली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठा अस्थिर झाल्या आहेत.
अमेरिकेने जहाजांना संरक्षण देण्यासाठी कारवाई केली असली, तरी इराणने युद्धविरामानंतर 10 पेक्षा जास्त वेळा हल्ले केले, अमेरिकेने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली, त्यामुळे लष्करी तणाव कायम आहे.
लष्कराचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ डॅन केन यांनी सांगितले की, हे हल्ले मोठ्या युद्धाच्या पातळीखाली आहेत; पण परिस्थिती कधीही बदलू शकते.
ट्रम्प यांची मूळ पाच उद्दिष्टे कितपत यशस्वी?
फेब्रुवारी 28 रोजी ट्रम्प यांनी पाच प्रमुख उद्दिष्टे जाहीर केली होती.
इराणला अण्वस्त्र मिळू न देणे
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट करणे
इराणी नौदल नेस्तनाबूत करणे
हेजबोल्ला आणि हमास यांसारख्या गटांना इराणचे जे समर्थन आहे ते रोखणे
इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे
यापैकी फक्त इराणी नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असे मानले जाते. उर्वरित उद्दिष्टे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
उद्दिष्टपूर्ती नाही, कारण...
इराणचा अणुसाठा अजूनही सुरक्षित आहे.
क्षेपणास्त्रांपैकी निम्म्याहून अधिक शिल्लक आहेत.
प्रॉक्सी गटांवरील नियंत्रणाबाबत अनिश्चितता आहे.
सत्तांतराचा दावा फक्त ‘व्यक्तीबदल’ इतकाच मर्यादित