

ओटावा : वृत्तसंस्था
कॅनडाच्या अर्थ विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका नवीन अहवालातून कॅनडामधून खलिस्तानी हिंसक दहशतवादी गटांना आर्थिक मदत मिळत असल्याचा खुलासा झाला आहे. ‘2025 असेसमेंट ऑफ मनी लाँडरिंग अँड टेररिस्ट फायनान्सिंग रिस्क’ नावाच्या या अहवालाने भारताच्या अनेक वर्षांच्या तक्रारींना अधिकृत दुजोरा दिला आहे.
या अहवालानुसार, बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन यासारख्या खलिस्तानी संघटनांना कॅनडातून राजकीयद़ृष्ट्या प्रेरित हिंसक दहशतवादी गटांच्या श्रेणीत ठेवले आहे. तपास संस्थांना असे आढळून आले आहे की, या संघटना त्यांच्या कारवायांना पाठिंबा देण्यासाठी नॉन-प्रॉफिट आणि धर्मादाय संस्थांसह इतर निधी नेटवर्कचा गैरवापर करत आहेत.
यापूर्वी कॅनडाची आर्थिक गुप्तचर संस्था फिनट्रॅकने 2022 च्या आपल्या अहवालात हिजबुल्ला ही कॅनडामधून सर्वाधिक निधी मिळवणारी दुसर्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असल्याचे सांगितले होते. आता या ताज्या अहवालात हमास आणि हिजबुल्लासारखे गट बँकिंग क्षेत्र, क्रिप्टोकरन्सी आणि गैर-लाभकारी संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा करत असल्याचे नमूद केले आहे.
कॅनडाच्या या अहवालाने अनेक वर्षांपासून भारत सरकार खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांबाबत कॅनडाला देत असलेल्या इशार्यांची सत्यता सिद्ध केली आहे.
1) हमास आणि हिजबुल्लासारख्या इतर दहशतवादी गटांप्रमाणेच खलिस्तानी गटही निधी मिळवण्यासाठी अनेक मार्गांचा वापर.
2) या गटांनी गैर-सरकारी आणि धर्मादाय संस्थांच्या नावाखाली निधी गोळा केला आहे, असे दिसून आले आहे.
3) कॅनडाच्या इंटेलिजन्स सर्व्हिसने आधीच कबूल केले आहे की, खलिस्तानी दहशतवादी कॅनडाचा वापर भारतात हिंसाचार घडवून आणण्यासाठी, निधी गोळा करण्यासाठी आणि योजना तयार करण्यासाठी करत आहेत.
4) हा अहवाल कॅनडा सरकारने भारतासोबतच्या संवेदनशील संबंधांच्या पार्श्वभूमीवर जारी केला आहे.