

Bangladesh PM Tariq Rahman on Sheikh Hasina : बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी जन्माष्टमीनिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मथुरेचा क्रूर राजा 'कंस' याच्याशी हसीना यांची तुलना करत, एका कंसरूपी शासकाने तब्बल दीड दशक बांगलादेशी जनतेला त्यांच्या लोकशाही हक्कांपासून वंचित ठेवले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अखेर सर्व जनता एकवटली आणि त्यांनी या फाशीवादी राजवटीला उलथवून लावले, असेही रहमान यांनी स्पष्ट केले.
राजधानी ढाका येथील उस्मानिया मेमोरियल ऑडिटोरियममध्ये धार्मिक व्यवहार मंत्रालय आणि हिंदू धार्मिक कल्याण ट्रस्ट यांच्या वतीने जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान तारिक रहमान यांनी पायी चालत हजेरी लावली. तेथे त्यांनी हिंदू धर्मगुरूंची भेट घेऊन समाजबांधवांना सन्मान निधीचे वाटप केले. तसेच, "बांगलादेशसह जगभरातील सर्व हिंदू आणि सनातन धर्मियांना मी जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो," अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा सांगताना रहमान म्हणाले, "सुमारे ५,००० वर्षांपूर्वी मथुरेत अत्याचार करणाऱ्या कंस राजाचे शासन होते. श्रीकृष्णाने कंसाचा पराभव करून अधर्माचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली."या पौराणिक कथेची सांगड बांगलादेशच्या राजकीय परिस्थितीशी घालत ते म्हणाले, "कंसासारख्या हुकूमशहाने दीड दशक बांगलादेशवर राज्य केले आणि लोकांना त्यांच्या लोकशाही अधिकारांपासून दूर ठेवले. परंतु, विविध राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या लोकांनी एकत्र येऊन बलिदान दिले आणि या फाशीवादी सत्तेचा अंत केला." आता बांगलादेश पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर आला असून, अर्थव्यवस्था, पारदर्शक प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सुधारणेसह देशाच्या पुनर्निर्माणाची वेळ आली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशात झालेल्या उठावानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली होती आणि सध्या त्या भारतात वास्तव्यास आहेत. हसीना यांच्यानंतर नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांनी हंगामी सूत्रे सांभाळली होती. त्यानंतर पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या 'बीएनपी' (BNP) पक्षाने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. एका दशकाहून अधिक काळ विदेशात राहिलेले तारिक रहमान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर बांगलादेश सातत्याने भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.