Pakistan mediation Iran US | अमेरिका युद्धविराम वाढवणार?

पाकिस्तानच्या मध्यस्थीतून अमेरिकेशी चर्चा; इस्लामाबादमध्ये दुसरी फेरी
Pakistan mediation Iran US |
Pakistan mediation Iran US | अमेरिका युद्धविराम वाढवणार?
Published on
Updated on

तेहरान, वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला 22 एप्रिलनंतर मुदतवाढ देण्याबाबत सध्या अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थीचे प्रयत्न वाढवले असून, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी बुधवारी तेहरानमध्ये इस्रायली नेत्यांशी चर्चा केली.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, अमेरिकेने औपचारिकरीत्या युद्धविराम वाढवण्याची मागणी केलेली नाही. मात्र, वॉशिंग्टन या चर्चांमध्ये सक्रियपणे सहभागी असून, करार होण्याची शक्यता सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. इस्लामाबादमध्ये दुसर्‍या फेरीच्या चर्चेची शक्यतादेखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की दौर्‍याला सुरुवात केली असून, प्रादेशिक पातळीवर शांततेसाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानकडून ‘शटल डिप्लोमसी’च्या माध्यमातून अमेरिका-इराण दरम्यान संवाद सुरू ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत.

इराणने पुढील चर्चेसाठी लेबनॉनमधील इस्रायली हल्ले थांबवण्याची अट घातली आहे. मात्र, इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील बिंत जुबैल भागात कारवाई तीव्र केली असून, ‘सुरक्षा क्षेत्र’ वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लेबनॉनमधील युद्धबंदी हा या चर्चेत कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. कारण इस्रायलने युद्धविराम करण्यास नकार दर्शविला आहे.

...तर आखातातील व्यापार रोखू

अमेरिकेने इराणच्या बंदरांवर लादलेली नौदल नाकाबंदी पूर्णपणे लागू केल्याचे जाहीर केले. इराणने या नाकेबंदीला प्रत्युत्तर देताना, ती कायम राहिल्यास संपूर्ण आखात क्षेत्रातील व्यापार रोखण्याचा इशारा दिला आहे.

युद्ध संपल्यास तेल किमतीत घट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. करार झाल्यास इराणला पुनर्बांधणीची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच युद्ध संपल्यास जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत घट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

चर्चेच्या तारखा निश्चित नाहीत

अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसर्‍या टप्प्यातील चर्चेसाठी अद्याप कोणत्याही तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर सध्या इराण दौर्‍यावर असून, ते दोन्ही देशांमध्ये संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी मध्यस्थी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news