

पुढारी ऑनलाईन डेस्क: Syria Civil War|सीरियातील चार शहरे बंडखोर गटाने ताब्यात घेतले आहे. आता सीरियाची राजधानी 'दमास्कस'वर देखील बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद सीरिया सोडून अज्ञातस्थळी गेल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचे कुटुंब आधीच सीरिया सोडून रशियाला गेले आहे. सीरियन लष्कराच्या दोन उच्च अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे.
सीरियातील बशर-अल-असाद सरकारला देशातील बंडखोर गटांनी आव्हान दिले आहे. सीरिया जवळपास आता बंडखोरांनी जिंकला आहे. बशर अल असद देश सोडून पळून गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे. बंडखोरांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयावर कब्जा केला. त्यांनी सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही इमारतीचा ताबा घेतला. ही एक प्रतिकात्मक साइट आहे, कारण येथून ते नवीन सरकारची घोषणा करू शकतात. सध्या बंडखोर हवेत गोळीबार करून राजधानीवर विजयाचा आनंद साजरा करत आहेत.
राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची 24 वर्षांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आली असून सीरिया असदपासून स्वतंत्र झाल्याची औपचारिक घोषणा सीरियन लष्कराच्या कमांडर्सनी केली आहे. तत्पूर्वी, आपल्या देशातील सर्व प्रकारचे प्रतिकार चिरडून टाकणारे असाद आपल्या खास विमानातून अज्ञात स्थळी जाताना दिसल्याचा दावा देखील सीरियामधील बंडखोर गटांनी केला आहे.
सीरियात अशी बंडखोरी आणि सत्तापालट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1950-60 च्या दशकात जेव्हा सीरियात सत्तापालट झाले तेव्हा लष्कराने आधी रेडिओ-टीव्ही इमारतीचा ताबा घेतला आणि नंतर नवीन सरकारची घोषणा केली. आता पुन्हा एकदा हयात तहरीर अल-शाम (एचटीएस ग्रुप) ने त्याच बंडाची पुनरावृत्ती केली आहे.
५० वर्षांपूर्वी बशर अल-असद यांचे वडील हाफेज अल-असाद यांनी मोठ्या रक्तपाताने देशाची सत्ता काबीज केली. बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "बॅथिस्ट राजवटीत (असाद पक्ष) 50 वर्षांच्या दडपशाहीनंतर आणि 13 वर्षांच्या गुन्हेगारी, यातना आणि विस्थापन आणि सर्व प्रकारच्या कब्जा करणाऱ्या सैन्याला तोंड देत असलेल्या दीर्घ संघर्षानंतर, आम्ही आज, 8 डिसेंबर, 2024, आम्ही त्या गडद युगाचा अंत आणि सीरियासाठी नवीन युगाची सुरुवात घोषित करतो.
असे सांगण्यात येत आहे की, बशर अल-असाद दमास्कस सोडून अज्ञात ठिकाणी पोहोचले आहेत. याबद्दल कोणतीही काहीही सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये असदच्या लष्करातील दोन जवानांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्याने उड्डाण केले आणि दमास्कातील अज्ञात ठिकाणी सोडले. यापूर्वी शनिवारी असद दमास्कसमधून पळून गेल्याचे सरकारने नाकारले होते. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसले नाहीत.
एचटीएस बंडखोर दमास्कसमध्ये पोहोचताच विमानतळावर गोंधळ उडाला. अल-असादचे समर्थक देश सोडण्याच्या प्रयत्नात विमानतळावर गर्दी करत आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंडखोरांना सीरियन आर्मीकडून फारसे आव्हान मिळालेले नाही. उदाहरणार्थ, होम्स ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर राजधानीत सहज प्रवेश करताना दिसले. त्यांनी काल राजधानी काबीज करण्यासाठी लढा सुरू केला आणि अवघ्या 24 तासांत ते तोफेसारखी शस्त्रे घेऊन राजधानीत पोहोचल्याचे सांगण्यात येते.
इराण आणि रशियाच्या मदतीने बशर अल-असाद हे सिरियात सत्तेवर आहेत. त्यांचे सरकार हे इराण आणि रशियाच्या पाठबळावरच टिकून होते. अलीकडील घडामोडींमुळे सीरियातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. रशियाचा मागील अडीच वर्षांहून अधिक काळ युक्रेनबरोबर संघर्ष सुरु आहे. तर इराण आणि हिजबुल्लाह यांच्या इस्रायलसोबत संघर्ष सुरुच आहे. अशा स्थितीत रशिया आणि इराणचे सीरियावरील नियंत्रण कमी झाले असून, सीरियातील बंडखोर गटांनी याचा फायदा घेत असाद यांना मोठा धक्का दिला आहे.