

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियातील सर्वांत तीव्र मानले गेलेले 'यागी' हे चक्रीवादळ (Yagi Tayfoon) चीनला धडकले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे घडलेल्या विविध घटनांत ९२ लोक जखमी झाले आहेत, तर २ लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे. या वादळाचा वेग २३४ किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आलेले आहे. त्यामुळे हे जगातील ट्रॉपिलक सायक्लॉन प्रकारातील दुसरे क्रमांकाचे तीव्र वादळ ठरले आहे. यापूर्वी पॅसिपिकमधील बेरिल हे वादळ सर्वांत प्रबळ ठरले होते.
हे वादळ या आठवड्याच्या सुरुवातीला उत्तर फिलिपाईन्सला धडकले होते, त्यात १६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी हे वादळ चीनमधील हैनान बेटावरील वेनचांग या शहराला धडकले. वादळामुळे संपूर्ण वेनचांग प्रांतातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. एकूण ८ लाख ३० हजार घरांना वीजपुरवठा होऊ शकलेला नाही, तसेच दोघांचा मृत्यू झाला असून ९२ लोक जखमी असल्याची माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था 'क्षीनहुआ'ने म्हटले आहे.
या वादळामुळे हैनान येथील ४ लाख ६० हजार लोकांना तर शेजारील गुंगडॉन प्रांतातील ५ लाख ७४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Yagi Tayfoon)
हैनान बेटाला २०१४मध्ये रामसून हे वादळ धडकले होते. यात ८८ लोकांचा बळी गेला होता, त्यानंतरचे यागी हे सर्वांत तीव्र वादळ आहे.