Strait of Hormuz Reopens: होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांना खुली.. ४८ दिवसांनंतर इराणकडून सागरी मार्ग खुला, ट्रम्प यांनी मानले आभार

व्यापारी जहाजांच्या वाहतुकीला इराणची परवानगी
Strait of Hormuz Reopens: होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांना खुली.. ४८ दिवसांनंतर इराणकडून सागरी मार्ग खुला, ट्रम्प यांनी मानले आभार
Published on
Updated on

Strait of Hormuz Reopens After 48 Days Iran Allows Shipping Trump said Thanks

तेहरान/वाशिंग्टन : पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि गेल्या ४८ दिवसांपासून असलेला अनिश्चिततेचा कालखंड संपवत इराणने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जगातील सर्वाधिक मोक्याचा सागरी मार्ग मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) आता व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करण्यात आली आहे. लेबनॉनमध्ये लागू झालेल्या युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने हा सकारात्मक पाऊल उचलले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत करत इराणचे आभार मानले आहेत.

युद्धबंदीच्या कराराचा परिणाम

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) द्वारे ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली. लेबनॉनमधील युद्धबंदीच्या करारानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांची ये-जा आता कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील. अराघची यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय युद्धबंदीचा कालावधी असेपर्यंत लागू असेल. इराणच्या 'पोर्ट्स अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन'ने (PMO) निर्धारित केलेल्या समन्वयित मार्गाचा वापर करून व्यापारी जहाजांना या क्षेत्रातून प्रवास करता येईल.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना त्यांनी म्हटले की, "इराणने आताच घोषणा केली आहे की, सामुद्रधुनीचा मार्ग आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला आणि सज्ज आहे. या निर्णयाबद्दल धन्यवाद!" या प्रतिक्रियेकडे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

जागतिक व्यापारासाठी संजीवनी

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक व्यापाराचा कणा मानला जातो. जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याचा मोठा वाटा याच मार्गावरून वाहून नेला जातो. गेल्या दीड महिन्यांपासून या मार्गावर असलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठ आणि शिपिंग उद्योगावर मोठे संकट ओढवले होते. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारपेठेत स्थिरता येण्याची शक्यता असून शिपिंग कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रादेशिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लष्करी घडामोडी आणि राजकीय पेच

एकीकडे हा मार्ग उघडला जात असतानाच, दुसरीकडे अमेरिकन सैन्याने माहिती दिली आहे की त्यांनी इराणच्या बंदरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी १३ जहाजे परतवून लावली आहेत. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या (CENTCOM) माहितीनुसार, सोमवारपासून सुरू झालेल्या नाकाबंदीनंतर अद्याप कोणतेही जहाज हा मार्ग ओलांडू शकलेले नाही.

तसेच, अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही इराणच्या मुद्द्यावरून खलबते सुरू आहेत. इराणविरुद्धच्या युद्धात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणारा ठराव अमेरिकन प्रतिनिधीगृहात (House of Representatives) मंजूर झाला आहे. इराणविरोधी लष्करी कारवाई रोखण्यासाठी विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने मांडलेला प्रस्ताव अवघ्या एका मताने फेटाळला गेला. या प्रस्तावाच्या विरोधात २१४ तर समर्थनार्थ २१३ मते पडली, ज्यामुळे प्रशासनाला इराणबाबत कठोर पावले उचलण्याचे स्वातंत्र्य कायम राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news