

Ranil Wickremesinghe Arrested in misuse funds case
सरकारी निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. या वृत्ताची पुष्टी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केली आहे. याबाबतचे वृत्त AFP ने दिले आहे. ७६ वर्षीय विक्रमसिंघे यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यादरम्यान त्यांना कोलंबो येथील गुन्हे अन्वेषण विभागात (CID) ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
त्यांच्यावर झालेली ही अटकेची कारवाई सप्टेंबर २०२३ मधील लंडनला गेलेल्या भेटीशी संबंधित आहे. तिथे ते त्यांच्या पत्नीच्या विद्यापीठ पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहिले होते. हा त्यांचा शासकीय दौरा नव्हता. पण त्यासाठी त्यांनी सरकारी पैशाचा वापर केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.
त्यांच्या अटकेनंतर, त्यांना कोलंबो फोर्ट मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर केले जाईल. तेथे त्यांच्यावर सरकारी निधीचा वैयक्तिक कारणासाठी वापर केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, विक्रमसिंघे यांनी त्यांच्या पत्नीच्या लंडन दौऱ्यासाठी सरकारी निधीचा वापर केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या पत्नीचा लंडन दौऱ्याचा खर्च स्वतः केला. त्यासाठी सरकारी निधीचा वापर केला नाही.
गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर जुलै २०२२ मध्ये विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले होते. श्रीलंकेत झालेल्या हिंसक निदर्शनानंतर गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २० जुलै रोजी संसदेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले होते. पण सप्टेंबर २०२४ मधील निवडणुकीत ते पराभूत झाले.