

Spain Train Crash : स्पेनमधील अतिवेगवान (हाय-स्पीड) रेल्वे नेटवर्कवर आज भीषण अपघात झाला. . माद्रिद ते सेव्हिल मार्गावरील टोलेडो प्रांतात दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर/मा मागून जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात तब्बल ४६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीदरम्यान झालेल्या मानवी चुकीमुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्पॅनिश रेल्वे नेटवर्क ऑपरेटर 'ADIF'ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात टोलेडो प्रांतात स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास घडला. माद्रिद-अंदालुसिया या हाय-स्पीड लाईनवर 'रेंफे एव्हीई' (Renfe AVE) या सरकारी कंपनीच्या ट्रेनने पुढे उभ्या असलेल्या 'इरिओ' (Iryo) या खाजगी ट्रेनला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रेनचे अनेक डबे रुळांवरून घसरून खाली खड्ड्यात/उंच कड्यावरून खाली कोसळले.अपघाताच्या वेळी 'रेंफे' ट्रेनमध्ये ३९७ प्रवासी तर 'इरिओ' ट्रेनमध्ये १४७ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती कास्टिला ला मांचा प्रांताच्या प्रवक्त्या एस्थर पाडिला यांनी दिली.
'एबीसी न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करणाऱ्या एका सार्वजनिक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा अपघात घडला. दुरुस्तीदरम्यान या कर्मचाऱ्याने समोरून येणाऱ्या 'इरिओ' ट्रेनबद्दल 'एव्हीई' हाय-स्पीड ट्रेनला वेळेत पूर्वसूचना दिली नाही, ज्यामुळे एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या आल्या आणि हा भीषण अपघात घडला.
या भीषण अपघातानंतर माद्रिद, सियुदाद रियल आणि अंदालुसिया दरम्यानची सर्व रेल्वे वाहतूक तात्काळ निलंबित करण्यात आली आहे. "दोन गाड्यांच्या धडकेनंतर माद्रिद-अंदालुसिया हाय-स्पीड लाईनवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे," अशी माहिती 'ADIF'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर दिली.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'X'वर पोस्ट करताना ते म्हणाले, "टोलेडो येथील भीषण रेल्वे अपघाताची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मी वाहतूक मंत्री आणि स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. बाधित प्रवाशांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी युद्धपातळीवर काम करत आहेत. या अपघातातील सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत."
स्पेनच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवरील हा दुसरा मोठा अपघात आहे. याआधी जानेवारी महिन्यात आदा मुझ (Adamuz) येथे झालेल्या ट्रेन दुर्घटनेत ४५ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१३ मध्ये झालेल्या अपघातात ८० जणांचा बळी गेला होता. एकाच वर्षात सलग झालेल्या या दुसऱ्या मोठ्या अपघातामुळे स्पेनच्या अत्याधुनिक हाय-स्पीड रेल्वेच्या सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.