पुढारी ऑनलाईन डेस्क: SpaceX Starship rocket | एलन मस्क स्पेस एक्सचे (SpaceX) स्टारशिप (Starship) रॉकेट बूस्टर प्रक्षेपित (लॉन्च) होताच, अवकाशात त्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर हे रॉकेट बेचिराख (SpaceX Starship rocket explodes after launch) झाले अन् त्याचे तुकडे अवकाशात पसरले आणि काही काळानंतर ते जमीनीवर कोसळले. स्पेसएक्सच्या स्टारशिपचे सातव्यांदा चाचणी करताना ही घटना घडली. पृथ्वीवर कोसळणारा रॉकेटचा हा कचरा जणू काही उल्कावर्षावासारखा दिसत होता. या घटनेचा व्हिडिओ स्वत: स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी शेअर केला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
टेस्ला, स्पेस एक्स आणि एक्स या कंपन्यांचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांनी स्टारशिप रॉकेट बूस्टरच्या अपयशाचा आणि त्याच्या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि चर्चेचा विषय बनला आहे. आतापर्यंत मस्क यांनी शेअर केलेला व्हिडिओ ४.५ कोटी वेळा पाहिले गेले आहे.
या व्हिडिओशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे व्हिडिओसोबत एलन मस्क यांनी दिलेले कॅप्शन. रॉकेट बूस्टरच्या ढिगाऱ्याखाली पडण्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले आहे की, "यश निश्चित नाही, पण मनोरंजनाची हमी आहे". मस्क यांनी या अपयशाचा मजेदार पद्धतीने आनंद घेतला आहे आणि या घटनेचा एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये, एक रॉकेट आकाशात उंच उडताना दिसत आहे आणि अचानक स्फोटाने त्याचे तुकडे होतात. मग हा कचरा शेकडो तुकड्यांमध्ये मोडतो आणि पृथ्वीकडे येऊ लागतो. हे दृश्य असे दिसते की, जणू काही तारे तुटून जमिनीवर पडत आहेत. हे खरोखरच एक अद्भुत दृश्य होते.