ह्युस्टन : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तान काश्मिर मुद्यावरून जगभरात भारताबद्दल गरळ ओकण्याचे काम करत असतानाच अमेरिकाही त्यांची पोलखोल करत आहे. आज (ता.२२) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची howdy modi मध्ये भेट ठरली आहे. असे असतानाच येथील बलुच, सिंधी आणि पख्तुन अमेरिकन यांनी एकत्र येऊन पाकिस्तानात सेना आणि आयएसआयकडून होणाऱ्या क्रुरतेपासून सुटका करावी, अशी विनंती मोदी- ट्रम्प यांना करणार आहेत.
हे सगळे एनआरजी स्टेडियम समोर पोस्टर आणि बँनर घेऊन उभे राहणार आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करणार आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच बलुच, सिंधी आणि पख्तुन अमेरिकन पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. या प्रतिनिधींनी पाकिस्तानात मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर हनन होत असल्याचा आरोप केला.
अमेरिकेतील बलुच नॅशनल मुव्हमेंटचे प्रतिनिधी नवी बक्श बलोच यांनी, आम्ही पाकिस्तानकडे स्वातंत्र्याची मागणी करत आहोत. भारत आणि अमेरिकेला यासाठी आम्हाला मदत करायला हवी, जशी १९७१मध्ये भारताने बांग्लादेशला केली होती. असे म्हटले आहे. आज आम्ही सर्वजण येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यासाठी आलो आहोत. पाकिस्तान सरकार आमच्या समाजातील लोकांच्या मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर हनन करत आहे. असे ही ते म्हणाले.
पाकिस्तानकडुन स्वातंत्र्य मिळावे अशा मजकुराचे फलक मोदी आणि ट्रम्प यांचे लक्ष वेधतील. आम्ही सिंधी नागरिक पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मागत आहोत. ज्या पद्धतीने भारताने बांग्लादेशला केली होती. आम्ही सिंधीसाठी वेगळा देश मागत आहोत. असे जिय सिंध मुताहिदा मुहाजचे जफर सहितो यांनी सांगितले आहे.
जफर पुढे म्हणाले, येथे फक्त मोदींचाच आवाज आहे. येथे खुप लोक आले आहेत. आम्ही सिंधी एका विचाराने ह्यूस्टनमध्ये एकत्र आलो आहोत. आम्हाला स्वातंत्र हवे आहे. आम्ही मोदींना सांगू की पाकिस्तानात नरसंहार सुरू आहे. लोकांच्या मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर हनन होत आहे. पाकिस्तान एक दहशतवादी देश आहे. ज्याला आयएसआय आणि लष्कर चालवतो. तेथे कोणतीच लोकशाही नाही.