

Saudi Arabia Medina accident :
सौदी अरेबियातील मदिनाजवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसची टँकरला धडक बसल्याने सुमारे ४२ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला. ही बस मक्काहून मदिनाकडे जात असताना रविवारी रात्री १.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) मुफ्रिहातजवळ हा अपघात झाला. बसमधील बहुतेक प्रवासी तेलंगणातील हैदराबादचे आहेत.
अपघाताच्या वेळी बसमधील प्रवासी झोपलेले होते, त्यामुळे धडकेनंतर बसला आग लागल्यावर त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. मृतांमध्ये किमान ११ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे, परंतु अधिकारी अद्याप आकडेवारीची पडताळणी करत आहेत. तेलंगणा सरकारने सांगितले की, रियाधमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना दूतावास अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यास सांगितले आहे.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले की, बसला आग लागली तेव्हा त्यामध्ये ४२ उमराह यात्रेकरू होते. ते रियाधमधील भारतीय दूतावासाचे अबू मथेन जॉर्ज यांच्या संपर्कात असून, त्यांनी अपघाताची माहिती गोळा करत असल्याचे सांगितले.
हैदराबादमधील अल-मीना हज आणि उमराह ट्रॅव्हल्स मार्फत प्रवास करणारे उमराह यात्रेकरू या भीषण बस अपघातात ठार झालेल्या लोकांमध्ये आहेत. ओवेसी यांनी केंद्र सरकारला मृतांचे मृतदेह भारतात परत आणण्याची आणि जखमींना योग्य वैद्यकीय उपचार पुरवण्याची विनंती देखील केली आहे.