

मॉस्को ः संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका भारताचे पररराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिक्सच्या मंचावर गुरुवारी मांडली.
रशियातील कझान या ठिकाणी ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जयशंकर म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कामकाज जुन्याच संरचनेनुसार सुरू आहे. या रचनेमुळे असमानता निर्माण होण्याची शक्यता आहे. जग झपाट्याने बदलत आहे. संयुक्त राष्ट्रांचे कामकाज कालबाह्य होण्याची चिन्हे आहेत. सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. स्थायी आणि अस्थायी सदस्य देशांच्या रचनेत बदल करण्याची प्रकर्षाने आवश्यकता आहे.
सुरक्षा परिषदेचा विस्तार करून भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला हवे. जागतिक स्तरावरील बहुउद्देशीय विकास बँकांची रचनाही संयुक्त राष्ट्रांसारखी कालबाह्य होत चालली आहे. सध्याचा काळ हा युद्धाचा नाही. त्यामुळे चर्चा आणि राजनैतिक मार्गावरूनच जागतिक समस्या सोडवायला हव्यात. कोव्हिड आणि कोव्हिडनंतरच्या काळात जागतिक समीकरणे बदलली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अर्थव्यवस्था गतिमान करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.