
Russian Navy Deputy Chief Mikhail Gudkov killed Ukraine attack
कुर्स्क (रशिया) : रशियन नौदलाचे उपप्रमुख व अनुभवी मरीन ब्रिगेडचे माजी कमांडर मेजर जनरल मिखाईल गुडकोव्ह (वय 42) यांचा युद्धात मृत्यू झाला आहे, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिली. यामुळे युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मोठा धक्का बसला आहे.
गुडकोव्ह यांचा मृत्यू बुधवारी (2 जुलै) कुर्स्क या युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या रशियन सीमावर्ती जिल्ह्यांपैकी एका भागात "लढाई दरम्यानच्या कर्तव्यपूर्तीत" झाला, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
गुडकोव्ह हे 2000 पासून रशियन लष्करात कार्यरत होते आणि 2023 साली राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने - “हीरो ऑफ द रशियन फेडरेशन” - गौरवले होते. सध्या ते युक्रेनविरोधात लढणाऱ्या एका नौदल ब्रिगेडचे नेतृत्व करत होते.
अधिकृत माहितीपेक्षा आधीच, रशियन व युक्रेनियन लष्करी टेलिग्राम चॅनल्सवरून गुडकोव्ह यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. युक्रेनच्या HIMARS (अमेरिकेने पुरवलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली) द्वारे कुर्स्कमधील एका रशियन कमांड पोस्टवर करण्यात आलेल्या हल्ल्यात ते इतर अधिकाऱ्यांसह ठार झाल्याचे या चॅनल्सवर म्हटले गेले आहे.
"व्हायकिंग" नावाने ओळख
गुडकोव्ह यांचा कॉल साईन ‘व्हायकिंग’ असा होता. त्यांनी यापूर्वी रशियन पॅसिफिक फ्लीटच्या मरीन ब्रिगेडचे नेतृत्व केले होते. या ब्रिगेडने युक्रेनमध्येही लढाई केली होती आणि कुर्स्कमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता, अशी माहिती रशियन युद्ध ब्लॉगर्सनी दिली.
मार्च 2025 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुडकोव्ह यांना नौदलाच्या उपप्रमुखपदी नियुक्त केले होते. तरीही ते सतत पुढील मोर्च्यांवर जात असत व सैनिकांना थेट मार्गदर्शन करत असत.
ते एक कर्तव्यनिष्ठ आणि मनाने खंबीर अधिकारी होते. गुडकोव्ह हे रशियन पॅसिफिक फ्लीटच्या 155वी गार्ड्स नेव्हल इन्फंट्री ब्रिगेडचे माजी कमांडर होते. ते त्यांच्या कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले, असे प्रिमोर्स्की प्रदेशाचे राज्यपाल ओलेग कोझेम्याकोंनी सांगितले.
त्यांनी एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये पुतिन यांच्या उपस्थितीत गुडकोव्ह यांना सन्मान प्रदान करताना दाखवले आहे. त्याचबरोबर युद्धक्षेत्रातील त्यांचे काही क्षण आणि राष्ट्रभक्तीपर गाण्याच्या पार्श्वभूमीवर तयार केलेले दृश्यही दाखवण्यात आले.
‘रोमानोव लाइट’ या रशियन युद्ध ब्लॉगच्या मते, गुडकोव्ह यांना त्यांच्या प्रामाणिक व पारदर्शक वृत्तीमुळे ओळखले जात होते. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची खरी माहिती सांगत असत – अशी सवय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दुर्मिळ मानली जाते.
रशियाच्या फार ईस्टमधील व्ह्लादिवोस्तोक बंदरात – जेथे पॅसिफिक फ्लीटचे मुख्यालय आहे – तेथे नागरिकांनी गुडकोव्ह यांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण केली. त्यांचे छायाचित्र एका प्रदर्शनात लावण्यात आले आहे, जिथे रशियाचे युद्धनायक म्हणून गौरविले गेलेले अधिकारी दाखवले आहेत.
गुडकोव्ह हे 2022 पासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धात मृत्युमुखी पडलेले सर्वोच्च रशियन लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक ठरले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे रशियन नौदलाच्या आणि विशेषतः मरीन युनिट्सच्या नेतृत्वावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
युक्रेनने गुडकोव्ह व त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांवर युद्धगुन्ह्यांचे आरोप केले होते. मात्र, रशियन प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेवर युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
दरम्यान, युक्रेनने मागील वर्षी कुर्स्क प्रदेशात अचानक हल्ला करत अनेक भाग ताब्यात घेतले होते. रशियाने नंतर ही संपूर्ण जमीन परत घेतल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात सीमेवर संघर्ष अद्याप सुरूच आहे.
दरम्यान, रशियन लष्कराने उत्तर-पूर्व युक्रेनमधील खार्कीव्ह प्रदेशातील मिलोवे गावावर ताबा मिळवल्याचा दावा गुरुवारी केला. हे गाव 2022 पासूनच्या आक्रमणानंतर प्रथमच रशियन सेनेने व्यापले आहे. युक्रेन सरकारने या दाव्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
तसेच, पोल्टावा या पूर्व युक्रेनमधील शहरावर रशियन हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले आहेत. एका लष्करी भरती केंद्रावरही हल्ला झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.