

Russia Ukraine war update
सोची (रशिया) : रशियाच्या सोची शहरात युक्रेनकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे एका तेल साठवण केंद्रात भीषण आग लागल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोची हे शहर सामान्यतः अशा हल्ल्यांपासून वाचलेले आहे, परंतु शनिवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे तिथे प्रचंड खळबळ उडाली आहे.
क्रास्नोदार प्रांताचे गव्हर्नर वेनियामिन कोंद्रातिएव्ह यांनी सांगितले की, “कीव प्रशासनाकडून सोचीवर ड्रोन हल्ला करण्यात आला असून, त्याचे अवशेष एका तेलाच्या टाकीवर पडल्यामुळे मोठी आग लागली.” या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 120 हून अधिक अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
या आगीमुळे सोची विमानतळावरील काही उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती, मात्र रशियाच्या विमान वाहतूक प्राधिकरणानुसार उड्डाणे आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये तेल साठवण केंद्रातून उठणारा घन काळा धूर दिसून येतो, मात्र त्याची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नाही.
सोची हे शहर युक्रेनच्या सीमारेषेपासून सुमारे 400 किमी अंतरावर आहे आणि इतर रशियन शहरांप्रमाणे येथे हल्ल्यांची संख्या कमीच होती. मात्र, मागील महिन्यात अशाच एका ड्रोन हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
युक्रेनकडून या नव्या हल्ल्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आली नसली तरी त्यांनी रशियाच्या नागरिकांवर झालेल्या नुकसानीच्या प्रत्युत्तरात हवेतून केलेले हल्ले वाढवण्याचा इशारा याआधीच दिला होता.
या घटनेचा पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिलेले "दहा दिवसांत युद्ध थांबवा" असे अल्टिमेटम. मात्र क्रेमलिनने या प्रस्तावाला फेटाळून लावले असून सांगितले की, संघर्षविराम झाल्यास युक्रेनला फायदा होईल.