

पुढारी ऑनलाईन डेस्क : Russia Strike Ukraine | रशियाने दक्षिण युक्रेनमधील झापोरिझ्झिया शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. नागरिकांवर होणारे हवाई हल्ले हे सर्वात क्रूर आहेत. जगातील इतर देशांनी युक्रेनला सुरक्षा देण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हल्ल्यानंतर रस्त्यावर रक्ताने माखलेले नागरिक आपत्कालीन सेवांद्वारे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. झेलेन्स्की आणि प्रादेशिक गव्हर्नर इव्हान फेडोरोव्ह यांनी सांगितले की, बुधवारच्या हल्ल्यात किमान १३ नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या काही मिनिटे आधी फेडोरोव्हने झापोरिझ्झिया प्रदेशावर विनाशकारी ग्लाइड बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारा दिला. दुपारी झापोरिझ्झियावर ग्लाइड बॉम्ब टाकण्यास सुरुवात झाली. नागरिकांवर होणारे हवाई हल्ले हे सर्वात क्रूर आहेत आणि जगातील इतर देशांनी युक्रेनला सुरक्षा देण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे, असेही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले. दरम्यान, रशियन अधिकाऱ्यांनी या प्रदेशात मोठा ड्रोन हल्ला केल्याची कबुली दिली आहे.