

Russia earthquake
पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ८.७ इतकी प्रचंड होती. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार (USGS), हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:२५ वाजता समुद्राखाली उथळ भागात झाला. या भूकंपामुळे रशिया, जपान, ग्वाम, हवाई आणि अलास्कासह पॅसिफिक महासागरातील अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, पॅसिफिक किनारपट्टीवर समुद्रात १ ते ३ मीटर उंचीच्या विनाशकारी लाटा उसळू शकतात.
जपानच्या एनएचके (NHK) या वृत्तवाहिनीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जपानच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात उत्तरेकडील होक्काइडो बेटापासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर होता. तर, USGS ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरापासून १३३ किलोमीटर आग्नेयेस, ७४ किलोमीटर खोलीवर होता. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८.० असल्याचे सांगण्यात आले होते. रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की येथे भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४.५४ वाजता ८.८ तीव्रतेचा भूकंप झाला.
टोकियो विद्यापीठाचे भूकंपशास्त्रज्ञ शिनिची साकाई यांच्या मते, "जेव्हा भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या उथळ भागात असतो, तेव्हा दूरवरच्या भूकंपांमुळेही त्सुनामी येऊ शकते. हा भूकंप त्याच प्रकारात मोडतो, कारण साधारणपणे ० ते ७० किलोमीटर खोलीवरील भूकंपांना उथळ भूकंप म्हटले जाते आणि या भूकंपाची खोली तर २० किलोमीटरपेक्षाही कमी होती." दुसरीकडे, अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने अलास्काच्या अल्युशियन बेटांच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि हवाईसह पश्चिम किनारपट्टीवरील भागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यातही कामचटकाजवळ समुद्रात पाच शक्तिशाली भूकंप झाले होते, त्यापैकी सर्वात मोठा भूकंप ७.४ तीव्रतेचा होता.
पृथ्वीच्या भूगर्भात ७ प्रमुख भूपट्ट्या (प्लेट्स) आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, त्या भागाला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार आदळल्याने या प्लेट्सचे कोपरे दुमडतात आणि जास्त दाब निर्माण झाल्यावर या प्लेट्स तुटायला लागतात. या प्रक्रियेत भूगर्भातील ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या ऊर्जेच्या उद्रेकामुळे भूकंप होतो.
ज्या ठिकाणी भूगर्भातील प्लेट्समध्ये हालचाल होऊन ऊर्जा बाहेर पडते, त्या जागेला भूकंपाचा केंद्रबिंदू (Epicenter) म्हणतात. या ठिकाणी भूकंपाचे कंपन सर्वात जास्त असते. जसजसे केंद्रबिंदूपासून अंतर वाढते, तसतसा कंपनाचा प्रभाव कमी होत जातो. मात्र, रिश्टर स्केलवर ७ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप असल्यास, आसपासच्या ४० किलोमीटरच्या परिसरात तीव्र धक्के जाणवतात.
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी 'रिश्टर स्केल' या एककाचा वापर केला जातो. याला 'रिश्टर मॅग्निट्यूड टेस्ट स्केल' असेही म्हणतात. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता १ ते ९ अंकांमध्ये मोजली जाते. भूकंपाच्या केंद्रबिंदूतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेच्या तीव्रतेचे हे मापन असते, ज्यावरून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता आणि विनाशकतेचा अंदाज लावला जातो.